महसूल, अर्थ खात्याचा विरोध असतानाही वाटप
मुंबई : प्रतिनिधी
शासकीय भूखंड देण्यास महसूल खाते, अर्थ खात्याचा विरोध असूनही यावर मंत्रिमंडळात कुठलीही चर्चा न करता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला.कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थान ही संस्था बावनकुळे यांच्याशी संबंधित आहे. या संस्थेला तंत्रशिक्षण आणि नर्सिंग कॉलेज सुरू करण्यासाठी ५ हेक्टरचा भूखंड कवडीमोल दरात बहाल केला आहे. त्यामुळे विरोधकांनी हल्लाबोल करण्यात येत आहे. यावर बावनकुळे यांनी याचे राजकारण करू नये, असे म्हटले आहे.
रेडीरेकनर दरानुसार या भूखंडाची किंमत तब्बल पाच कोटी इतकी असल्याचे सांगितले जाते. या भूखंडाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अर्थ खाते आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या महसूल खात्याचा विरोध होता. मात्र, या दोन्ही खात्यांच्या अभिप्रायाला केराची टोपली दाखवत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा न करता ५ हेक्टरचा भूखंड बहाल केला. आता यावरून वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महायुतीवर कडाडून टीका केली.
देवस्थानात राजकारण नको
यावर खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टोक्ती दिली. कोरडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थान हे एकट्या बावनकुळे याचे नाही. मागे पण मी अध्यक्ष होतो. मात्र, हे एक सामाजिक, धार्मिक संस्थान आहे. संस्थानला १ कोटी ४८ लाख भरायचे आहेत. येथे १ रुपयात विद्यार्थी शिक्षण घेतात. किमान देवस्थानात राजकारण करू नये, असे ते म्हणाले.