मुंबई हायकोर्टाने ओढले ताशेरे
मुंबई : प्रतिनिधी
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. हे एन्काउंटर वादग्रस्त ठरले असून कोर्टानेही यावरून ताशेरे ओढले आहेत. एन्काउंटरचा संपूर्ण घटनाक्रम संशयाच्या भोव-यात अडकला आहे. एवढेच नव्हे तर हे एन्काउंटर असूच शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी आज सुनावणी झाली असून आता पुढील सुनावणी पुढच्या गुरुवारी होणार आहे. या सुनावणीत जखमी पोलिसाचे वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आदी पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस वाहनातून आरोपीला घेऊन जात असताना चार पोलिस अधिका-यांची गरज काय होती, यासाठी अतिरिक्त माणसांचा वापर झाला असे वाटत नाही का, असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला. तसेच त्याने हातातून पिस्तुल खेचून घेतली, तेव्हा चार पोलिस अधिका-यांनी त्याला रोखायला हवे होते. चार पोलिसांना तो आवरता आला नाही का, असाही प्रश्न न्यायालयाने विचारला.
अक्षयने तीन गोळया झाडल्या असे तुम्ही म्हणालात. एक गोळी पोलिसाला लागली. मग इतर दोन गोळ््या कुठे आहेत, आपण स्वसंरक्षणासाठी आपण पायावर किंवा हातावर गोळी मारतो. गोळी कुठे मारावी याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले जाते, अशाही प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने केली. त्यावर सरकारी वकिलांनी पोलिसांनी विचार केला नाही, त्यांनी घटनेवर तात्काळ प्रतिक्रिया दिली, असे म्हटले.
अक्षयला कुणी रोखले का नाही?
अक्षय शिंदेने जेव्हा हातात पिस्तुल घेऊन कोणावर रोखली, तेव्हा इतर अधिका-यांनी त्याला रोखले का नाही. तो फार स्ट्राँग माणूस नव्हता. त्यामुळे हे स्वीकारणे कठीण आहे. हे एन्काऊंटर असू शकत नाही, असेही न्यायमूर्ती म्हणाले.