26.2 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रगंज, कमकुवत फ्रेममुळे महाराजांचा पुतळा कोसळला

गंज, कमकुवत फ्रेममुळे महाराजांचा पुतळा कोसळला

चौकशी समितीकडून धक्कादायक अहवाल सादर

मुंबई : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा कोसळला याचा चौकशी समितीकडून अहवाल सादर करण्यात आला. चुकीच्या वेल्ंिडग कामामुळे राजकोट येथील महाराजांचा पुतळा कोसळला. तसेच गंज आणि कमकुवत फ्रेममुळे ३५ फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, असा अहवाल मालवण दुर्घटना प्रकरणी चौकशी समितीकडून १६ पानी अहवाल सादर करण्यात आला.

दरम्यान, शिल्पकाराने सादर केलेल्या क्ले मॉडेलवर आधारित छत्रपती शिवाजी महाराजांच्या केवळ ६ फूट उंचीच्या पुतळ्याला महाराष्ट्र कला संचालनालयाने मंजुरी दिल्याचे सांगण्यात येत होते. प्रख्यात व्यक्तींच्या पुतळ्यांना जर ते त्या व्यक्तिमत्त्वांच्या चेह-याचे आणि इतर शारीरिक वैशिष्ट्यांचे अचूक प्रतिनिधित्व करत असतील तरच संचालनालय मंजूर करते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला मराठा साम्राज्याचे संस्थापक यांचा ३५ फूट उंच पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला.

दरम्यान कोणत्याही पुतळ्याचा पाया अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी पीडब्ल्यूडीची परवानगी घ्यावी लागते. या प्रकरणात स्ट्रक्चर कन्सल्टंट चेतन पाटील यांनी पीडब्ल्यूडीकडून बेससाठी परवानगी घेतल्याचे सूत्राने सांगितले. बांधकाम भारतीय नौदलाच्या देखरेखीखाली करायचे होते. भारतीय नौदलाने कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला, कारण या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि तपास पूर्ण झाल्यानंतर तथ्ये समोर येतील.

पुतळा उभारणीचे आदेश नौदलाने दिले होते. नेव्हल डॉकयार्ड, मुंबई यांनी भारतीय नौदल दिनानिमित्त जयदीप आपटे यांना कार्यारंभ आदेश दिला होता. पुतळा आणि पायासाठी संरचना सल्लागार म्हणून चेतन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. या बांधकामाची देखरेख भारतीय नौदलाने करायची होती. मात्र, उद्घाटनानंतर दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी राज्य सरकारी यंत्रणांची असल्याचे भारतीय नौदलाने म्हटले आहे.

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR