देवणी : बाळू तिपराळे
देवणी तालुक्यातील शेतक-यांनी यावर्षी अनेक नैसर्गिक संकटाचा सामना करीत खरिपातील सोयाबीन पिकाचा पेरा केला आहे. सध्या अवघ्या ४ ते ५ दिवसांवर सोयाबीनची कापणी येऊन ठेपली आहे सोयाबीन काढणी वेळेत होण्यासाठी, शेतकरी मजुरांच्या शोधात आहे. एकरी थेट पाच हजार रुपये मागणी होत असल्याने, शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.
तालुक्यातील शेतकरी कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी मागील काही वर्षापासून नगदी पीक म्हणून सोयाबीन शेतीकडे वळला आहे. यंदा तर मोठ्या अडचणीतून शेतक-यांनी सोयाबीन पीक हातात आणले आहे. यावर्षी तालुक्यात जवळजवळ २५ हजार ८३८ हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. निसर्गाचा असमतोलपणा संभाळत शेतक-यांंनी सोयाबीन पिक हातात आणले आहे. सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी मजूरांना सोयाबीन कापणीचे बोलत आहे मात्र मजूर वर्गाकडून एकरी पाच ते साडे पाच हजार रुपये लागतील तर आम्ही सौदा पक्का करु नाही तर तुम्ही तुमचे पाहुन घ्या, असे सांगत आहे. बहुतांश शेतक-याकडे शेती करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याने नाईलाजाने पाच हजार रुपये एकराने सौदा पक्का करावा लागत आहे.
काही शेतक-यांनी मात्र विलंब झाला तरी चालेल मात्र सोयाबीन घरीच कापणी करायची असा निश्चय घेतला आहे. तालुक्यात मागील दोन ते तीन वर्षापासून परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादन शेतक-यांंना खरिपात निघाले नाही. यामुळे शेतक-यांचा शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. गतवर्षी ऐन सोयाबीन सोंगणीलाच परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतक-यांंचे हजारो हेक्टरवरील सोयाबीन उद्ध्वस्त झाले होते.
यंदा तीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतक-यांना भीती आहे. शिवाय परतीच्या पावसाच्या घास्तीनेच शेतक-यांनी सोयाबीन कापणी वेळेत झाली पाहीजे म्हणून लगबग सुरू केली आहे. नाईलाजाने सोयाबीन काढण्यासाठी एकरी पाच हजार रुपये द्यावे लागत आहेत. आज रोजी सोयाबीन पेरणीपासून काढणी पर्यंतचा खर्च पाहिल्यास शेतक-यास राहाते तरी काय असा प्रश्न बेंबळी येथील शेतकरी जयदीप भोसले यांनी व्यक्त केला आहे.