अमरावती : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या अॅक्शन मोडवर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे महाराष्ट्रात अनेक दौरे करताना दिसत आहेत. त्यातच आता राज ठाकरे यांनी मिशन विदर्भ सुरु केले आहे. राज ठाकरे आजपासून दोन दिवस अमरावती दौ-यावर आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ सुरु केले आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे आजपासून दोन दिवस अमरावती दौ-यावर आहेत. अमरावतीच्या ग्रॅड मैफिल इन या हॉटेलमध्ये राज ठाकरेंचा मुक्काम असणार आहे. राज ठाकरेंच्या अमरावती दौ-याच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी अमरावती शहरात जोरदार बॅनरबाजी केली आहे. यातील एका बॅनरवर ठाकरे घराण्यातील स्वाभिमानी भावी मुख्यमंत्री हिंदू जननायक असा राज ठाकरेंचा उल्लेख करण्यात आला आहे.
११ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिका-यांशी चर्चा
राज ठाकरे हे सकाळी ७ वाजता अमरावतीत दाखल झाले. अमरावतीत रेल्वे स्टेशनवर राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. सध्या राज ठाकरे विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिका-यांशी चर्चा करत आहेत. आज राज ठाकरे पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. तर उद्या पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांची विदर्भातून पहिली यादीही लवकरच जाहीर होईल, असे म्हटले जात आहे.