जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील निर्मिती सन १९९९ साली झाली. यानंतर पाच – दहा वर्षांत सर्व कार्यालये तालुक्याच्या ठिकाणी येणे गरजेचे असते परंतु तालुक्याच्या ठिकाणी आजही अनेक कार्यालये नाहीत. यात वनीकरण विभागाचे कार्यालय होय. जळकोट या ठिकाणी तालुका वनीकरण विभागाचे कार्यालय तात्काळ मंजूर करावे अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
जळकोट येथे वनीकरण विभागाचे कार्यालय नसल्यामुळे वनीकरण विभागाच्या अधिका-यांशी संपर्क साधायचा झाल्यास अहमदपूरकिंवा उदगीर येथे संपर्क साधावा लागत आहे . जळकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. याचे रक्षण करण्याची जबाबदारी वन विभागाची असते परंतु जळकोट तालुक्याचा कार्यभार उदगीर तसेच अहमदपूर येथील कार्यालयामधून पाहिला जात आहे. यामुळे उंटावर बसून शेळ्या हाकण्याचा प्रकार घडत आहे. या कारणाने जळकोट तालुक्यामधील वनसंपदा मोठ्या प्रमाणामध्ये तोडली जात आहे. जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरामध्ये तसेच मरसांगवी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सागवान आहे. याचे रक्षण करण्याची जबाबदारी देखील वन विभागाची आहे परंतु सागवानही मोठ्या प्रमाणात तोडले जात आहे. यासोबतच जळकोट तालुक्यामध्ये हरीण, ससे, कोल्हे आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात याचे रक्षण करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वन्य प्राण्यांसाठी पानवठे तयार करावे लागतात परंतु तालुक्यात अनेक ठिकाणी पाणवठे दिसून येत नाहीत. यामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होताना दिसून येते.
वन विभागाकडून झाडे लावण्याचे नियोजन देखील करण्यात येते. जळकोट तालुका डोंगरी आहे. यामुळे जळकोट तालुक्यात अधिक वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे परंतु वन विभागाचे तालुका कार्यालय जळकोट येथे नसल्यामुळे म्हणावी तशी वृक्ष लागवड होताना दिसून येत नाही. जळकोट तालुक्यासाठी शासनाने एक, दोन कर्मचारी नियुक्त केले आहेत ते कुठे असतात याचाही पत्ता नसतो एखादा वन्य प्राणी जखमी झाल्यास सर्प मित्राला फोन करावा लागतो . जळकोट या तालुक्यातील ठिकाणी वन विभागाचे तालुका कार्यालय होणे गरजेचे असून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी विशेष लक्ष देऊन जळकोट येथे तात्काळ कार्यालय मंजूर करावे अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.