पुणे : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे तुतारी फुंकणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देऊन इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्या संदर्भातील पोस्ट मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांकडून व्हायरल केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी आज सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून आमचा मतदारसंघांमध्ये जनता दरबार सुरू होता. आज शेवटचा जनता दरबार पार पडला. जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी, शेतक-यांच्या समस्या आम्ही जाणून घेत आहोत. लोकांचा आग्रह आहे की मी इंदापूरमधून निवडणूक लढवली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ असल्याने त्यांच्या मताचा विचार करावा, असा आग्रह असल्याचे ते म्हणालेत. त्यामुळे निवडणूक लढवण्याच्या संदर्भात मतदारसंघातून कार्यकर्त्यांचे प्रचंड प्रेशर असून त्या संदर्भात मला निर्णय घ्यावाच लागेल असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
पितृ पंधरवडा झाल्यानंतर मला निर्णय घ्यावाच लागेल असे सांगत त्यांनी इंदापूरच्या निवडणुकीवर भाष्य केले. ते म्हणाले की मला यावेळी सर्वच बाबतीत विचार करावा लागेल. त्याचबरोबर लोकांचे जे म्हणणे आहे त्याचा सुद्धा गंभीरपणे विचार करावा लागेल. दरम्यान हर्षवर्धन पाटील यांना पण मतदारसंघांमध्ये व्हायरल होत असलेल्या पोस्टबाबत विचारले असता ते म्हणाले की आजपर्यंत इंदापूर मतदारसंघाची वाटचाल ही लोकशाहीच्या मार्गाने झाली आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये हा कार्यकर्त्यांना अधिकार असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी….
दरम्यान, यापूर्वी इंदापूरमध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे बॅनर झळकले आहेत. त्यावर ‘इंदापूर तालुक्याची झाली तयारी…..हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी….’ असे लिहिण्यात आले होते. इंदापूरच्या आठवडी बाजाराच्या दिवशी भर चौकात एक फ्लेक्स लागला होता. त्यावर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे फोटो होते.