नागपूर : प्रतिनिधी
लोकसभेनंतर आता वेध लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे, विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर खलबतं सुरू आहेत. कोणत्या घटक पक्षाला किती जागा मिळणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली असतानाच आता नागपुरातून मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अमृता फडणवीस या मैदानात उतरल्या आहेत. त्या गेल्या तीन दिवस दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील महिला मंडळ आणि लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमांना भेट देत आहेत. त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. दरम्यान यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी देखील घरोघरी भेटी देऊन संवाद साधला होता.
यावेळी बोलताना अमृता फडणवीस यांनी म्हटले की, लाडकी बहीण योजना ही देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणली आहे. छोट्या छोट्या मदतीने महिलांची आर्थिक सक्षमता वाढावी असा या योजनेचा उद्देश आहे. केंद्रात मोदी सरकार आले, आता राज्यात भाजपा सरकार आले पाहिजे असे यावेळी अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.