24.9 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रमहात्मा फुलेंनीच शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली

महात्मा फुलेंनीच शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली

नाशिक : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा नाशिकमध्ये संपन्न झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, छगन भुजबळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अजित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबद्दल स्पष्टपणे विधान केले आहे. मागे पुण्यात मोहन भागवतांनी केलेल्या विधानानंतर वाद उभा राहिला होता.

मोहन भागवत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देताना म्हटले होते की, इंग्रजांच्याविरुद्ध लढतानासुद्धा शिवाजी महाराज इथेच होऊन गेले. इथे सुद्धा त्यांचे स्मरण व्हावे म्हणून जागरण केले. रायगडावर उत्सव सुरु केला. टिळकांनी ते सर्व शोधून काढले वैगरे वैगरे.. ही इथली स्थिती असतानासुद्धा रविंद्र्रनाथ टागोरांनीही शिवाजी महाराजांवर कविता लिहिली.

अजित पवार म्हणाले की, महात्मा फुले यांनी पुणे ते रायगड पायी चालत जाऊन पाला-पाचोळ्यात असलेली शिवरायांची समाधी शोधून काढली, हे मी मनाचे सांगत नाही याचे कागदपत्रं आहेत. त्यांनी समाधीची साफसफाई करुन फुले वाहिली, हे सगळे कागदपत्रांमध्ये आहे. त्यावरुनच मी बोलतोय. पुढे महात्मा फुलेंनी पुण्यात शिवछत्रपतींचा सोहळा सुरु केला असे अजित पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपवर जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. अजित पवारांना सोबत घेण्यावरुनही संघाने भाजपला खडेबोल सुनावले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाला तेही एक कारण असल्याचे लेखामधून म्हटलं गेलं. त्यानंतर अजित पवार गटाकडून सातत्याने प्रतिक्रिया येत होत्या. दरम्यान, शनिवारी नाशिकमध्ये पुतळा लोकार्पण सोहळ्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, एवढा मोठा अर्धाकृती पुतळा मी महाराष्ट्रात पाहिला नाही. या स्मारकामुळे नाशिकच्या लौकिकात भर पडली आहे. शिवछत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने आपण राज्य चालवतो. महापुरुषांचा विचार घेऊनच राज्यात निर्णय घेतले जातात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR