नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. राजकारणापलीकडे जाऊन हे दोघे नेते मैत्री जपत आले आहेत. मात्र, यावेळी चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचा पक्ष २८८ पैकी २३० जागांवर आपले उमेदवार देणार आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाचाही समावेश असल्याचे बोलले जात असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज ठाकरे केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवार देणार नाहीत तर, उमेदवार अंतिम झाल्याचे सुद्धा आता स्पष्ट होत आहे. राज ठाकरे अमरावती दौ-यावर असताना विदर्भातील अनेक उमेदवार फायनल झाले आहेत. परंतु त्यांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही. त्यात दक्षिण-पश्चिम नागपूर आणि विदर्भातील अनेक उमेदवारांचा समावेश आहे.
राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळी विधानसभा निवडणुकीत २३० उमेदवार मैदानात उतरवणार असल्याचे राज ठाकरे यांनी आधीच जाहीर केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून कुणासोबत युती किंवा आघाडी केली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळी संपूर्ण ताकदीनिशी सत्ताधा-यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात मनसे आपले उमेदवार देणार आहे.
फडणवीसांविरोधात तुषार गिरे यांचे नाव चर्चेत
मध्यंतरी राज ठाकरे यांनी पश्चिम विदर्भाचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवार देणार असे स्पष्ट संकेत दिले होते. मुळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कुणाला मैदानात उतरवले जाईल याबाबत उत्सुकता होती. मात्र, सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार तुषार गिरे यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते असे देखील बोलले जात आहे.