बेरूत : वृत्तसंस्था
इस्रायलने आज सकाळी पहिल्यांदाच लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये आपले लष्कर घुसवले. यावेळी इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये अनेक इमारतीवर हवाई हल्ले करून बॉम्बने उडवून दिल्या. या हल्ल्यात किमान ४ नागरिक ठार झाल्याची माहिती आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी गट पीएफएलपीने म्हटले आहे की या हल्ल्यात त्यांचे तीन नेते मारले गेले. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील वाढत्या संघर्षात इस्त्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये घुसून निवासी भागावर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, बेरूतमधील कोला जिल्ह्यातील एका इमारतीच्या सर्वात वरील मजल्यावर इस्रायली लष्कराने पहिला हवाई हल्ला केला. सुत्रांच्या मते, पॅलेस्टिनी दहशतवादी गट पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन (पीएफएलपी) ने सांगितले की कोला जिल्ह्यात इस्त्रायली हल्ल्यात त्यांचे तीन नेते मारले गेले. यापूर्वी असेही वृत्त आले होते, की या हल्ल्यात अल-जमा अल-इस्लामीया (इस्लामिक गट) या दुस-या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला ठार करण्यात आले होते. मात्र, या संघटनेने हे वृत्त फेटाळून लावले आहे.
रविवारी रात्रीपासून बेरूतवर हवाई हल्ले
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायली लष्कराने रविवारी रात्रीपासून बेरूतमधील निवासी भागात ड्रोन हल्ले सुरू केले आहे. इस्रायली लष्कराने बेरूतमधील बेका भागात हल्ले वाढवले आहेत. आयडीएफने दिलेल्या वृत्तानुसार लढाऊ विमानांनी गेल्या २ तासांत बेका खो-यातील हिजबुल्लाहच्या अनेक ठिकानांनावर हल्ला केला असून, ज्या इमारतींवर हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी रॉकेट लाँचर्स आणि हिजबुल्लाहने शस्त्रे लपून ठेवली होती.