पुणे : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळीने थैमान घातले आहे. मध्य महाराष्ट्रासह, उत्तर महराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस सुरू आहे. दरम्यान काही भागात गारपीटही मोठ्या प्रमाणात झाली आहे. दरम्यान आणखी दोन दिवस पावसाचे असून, त्यानंतर धुक्याची निर्मिती होऊन, थंडीला सुरुवात होणार आहे, हवामान विभागाने आज प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये ही माहिती दिली आहे.
हवामान विभागाने पुढे म्हटले आहे की, आज मंगळवारी २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. त्यानंतर वायव्य आणि मध्य भारतातील किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होणार आहे. दरम्यान पुढील दोन दिवसांनंतर सकाळच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचे धुके पसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुढील दोन दिवसांत उत्तर भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर राजस्थान तर ईशान्येकडील आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांत मध्यम स्वरूपाच्या धुक्याची निर्मिती होण्याची शक्यता आहे, असे देखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.