मुंबई : प्रतिनिधी
काही दिवसांतच राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता उध्दव ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाळेच्या गणवेशावरुन टीका केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यंदा पहिली ते आठवीच्या मुलांना मोफत गणवेशाची घोषणा केली, शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा कार्यक्रम आणि राज्य योजनेतून दोन मोफत गणवेश देण्यात येणार होते. या गणवेशाचा दर्जा आणि रंग समान असावेत म्हणून राज्यात ‘एक राज्य, एक गणवेश’ योजना चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू केली आहे. त्यासाठी शासनाच्या खरेदी धोरणानुसार निविदा प्रक्रिया राबवून कापड पुरवठा सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती.
गणवेश किती चांगले दिले जात आहेत, हे सांगताना त्यांनी दोन गणवेश सभागृहात दाखविले होते. दरम्यान, आता या गणवेशावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा कार्यक्रम आणि राज्य योजनेतून दोन मोफत गणवेश देण्यात येत आहेत. ४० लाख ६० हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार होते. ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येतील असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले होते. मात्र आता अनेक ठिकाणी निम्मे सत्र संपले तरी गणवेश मिळाला नसल्याचे समोर आले. विद्यार्थ्याच्या गणवेशाच्या कपड्याचा दर्जा पाळला नसला गेल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांची चेष्टा लावल्याचेही अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
पापाचा माल गपापा करण्याची सवय : दानवे
या चिमुकल्याने घातलेला गणवेश प्रतिबिंब आहे, महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे! पहिल्याची बाही दुस-याच्या शर्टाला, दुस-याचा खिसा तिस-याच्या पॅन्ट ला.. काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी. विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा, तुम्ही तर त्याचीच प्रयोगशाळा करून ठेवली आहे. १५ ऑगस्ट पर्यंत ४५ लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ २४ लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले आहेत. ते ही हे असले बोगस! कपड्याचा धड दर्जाही पाळण्यात आलेला नाही, न शिवण धडाची! पापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत.
गोरगरीब विद्यार्थ्यांची चेष्टा नको : रोहित पवार
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. जनता हिशोब चुकता करेल, मुख्यमंत्री साहेब आठवतंय का? मी सभागृहात गणवेशाच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्न केले असता तुम्ही माझी चेष्टा केली होती. माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण आता या गोरगरीब विद्यार्थ्यांची तरी चेष्टा करू नका. अन्यथा नियती अशी चेष्टा करेल की या गणवेशाप्रमाणे महायुतीची राजकीय अवस्था वर-खाली झाल्याशिवाय राहणार नाही.