नवी दिल्ली : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विशेषाधिकारांचा वापर करत केवळ आर्थिक परिस्थितीमुळे प्रवेशापासून वंचित राहणा-या उत्तरप्रदेशातील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील खतौली गावातील दलित विद्यार्थ्यासाठी आयआयटी धनबादचे दार खुले केले. ‘एवढी मोठी प्रतिभा केवळ पैशांच्या अभावी वाया जाता कामा नये,’ अशी टिपणी करत सरन्यायाधीशांनी संबंधित विद्यार्थ्याला भावी करिअरसाठी शुभेच्छाही दिल्या. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच असा प्रसंग घडला आहे.
जेईई-अॅडव्हान्सची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आयआयटी प्रवेशासाठी अतुल कुमार याने समुपदेशनाला हजेरी लावली होती. यानंतर त्याचा आयआयटी धनबादमध्ये प्रवेशही निश्चित झाल्याचे सांगण्यात आले होते. या प्रवेशासाठी २४ जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शुल्क जमा करण्याची मुदत होती. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्याने गावातील लोकांची मदत मागितली. मात्र, पैसे भरेपर्यंत शुल्क जमा करण्यासाठीचे सर्व्हर बंद झाले होते. शुल्क भरायच्या केवळ चार सेकंद आधी संबंधित सर्व्हर बंद झाले होते.
प्रवेश न मिळाल्यामुळे अतुल कुमार याने झारखंड उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याला तेथे दिलासा न मिळाल्यामुळे त्याने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. आपल्या अशिलाचे वडील मेरठच्या कापड कारखान्यात मजूर असून ते दिवसाला ४५० रुपये मिळवितात. त्यांच्यासाठी १७ हजार ५०० रुपयांची तरतूद करणे कठीण आहे. गावातील लोकांनी एकत्र येत शुल्कासाठीचे पैसे जमा केले होते, असा युक्तिवाद अतुल कुमार याच्यामार्फत त्यांच्या वकिलांनी केला.
उभय बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी प्रतिभाशाली युवकाची प्रतिभा वाया जाण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही असे सांगितले. पीडित युवक झारखंड कायदा सेवा प्राधिकरणात गेला, तेथून त्याला उच्च न्यायालयात पाठविण्यात आले, आता हा युवक सर्वोच्च न्यायालयात आला आहे. एका विद्यार्थ्याला एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणाकडे पाठविले जात आहे, असा शेरा मारत चंद्रचूड यांनी अतुल कुमार याला प्रवेश दिला जावा, असे आदेश दिले.