26.4 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणींचे पैसे कापणा-या बँकांवर कारवाई

लाडक्या बहिणींचे पैसे कापणा-या बँकांवर कारवाई

महिला आणि बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे. या लाभातून काही बँका मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करतात. सेवा शुल्काच्या नावाखाली रक्कम कपात करणा-या अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महिला आणि बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी येथे दिली.

आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय आढावा बैठक घेतला. या बैठकीत बोलताना तटकरे यांनी, काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार सिडींग नसल्याने लाभ मिळत नाही. याबाबत अंगणवाडी सेविका, मदतनिस यांच्या मदतीने २ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी. बँकेशी संबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात, अशा सूचना बैठकीत उपस्थित जिल्हा महिला आणि बाल विकास अधिका-यांना दिल्या.

नांदेड जिल्ह्यात प्रत्यक्षात अर्ज भरताना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आणि पुरुषांचे आधार क्रमांक, खाते क्रमांक दिले गेल्याने पुरुषांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करून ज्या केंद्रावर हे अर्ज भरले गेले त्या केंद्र चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश तटकरे यांनी या वेळी दिले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत २ कोटी ४० लाख महिलांची नोंदणी झाली असून १ कोटी ८७ लाख पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. उर्वरित अर्जांची पडताळणी तातडीने करून घ्यावी, अशा सूचनाही आदिती तटकरे यांनी बैठकीत दिल्या. या बैठकीला महिला आणि बाल विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे, सर्व जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR