चाकूर : प्रतिनिधी
तालुक्यातील भाटसांगवी येथील पती पत्नी दस-याचे धुणे धुण्यासाठी गेल्यावर तलावात पाय घसरून पाण्याचा अंदाज न आल्याने पती बालाजी कोंडीबा वाघमारे वय ५३ वर्षे यांचा मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास पाण्यात बुडून करून मृत्यू झाला तर पत्नी गयाबाई बालाजी वाघमारे वय ४५ वर्षे यांचे नशीब बळवत्तर म्हणून त्या बालंबाल बचावल्या. शोधमोहिमेत अग्निशमन दलाच्या शोध मोहिमेत बालाजी कोंडीबा वाघमारे यांचे प्रेत सापडले.
चाकूर तालुक्यातील भाटसांगवी येथील रहिवाशी बालाजी कोंडीबा वाघमारे आणि त्यांच्या पत्नी गयाबाई बालाजी वाघमारे हे गावातील पाझर तलावावर दस-याचे धुणे धुण्यासाठी गेले असता त्या दोघांनाही पोहता येत नव्हते. तलावावर दस-याचे धुणे धुण्यासाठी गेल्यावर दोघांनीही धुणे आटोपून शेवटचे चवाळे धुऊन पसरविण्यात मग्न असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पती बालाजी कोंडीबा वाघमारे यांचा खोल पाण्यात पाय घसरला आणि ते बूचकुळ्या खायला सुरु असताना पत्नी गयाबाई वाघमारे यांनी आरडाओरड करताच आजूबाजूचे शेतकरी धावत येऊन त्यांच्या साडीला पकडून ओढल्याने तिचे नशीब चांगले म्हणून त्या पाण्यात बुडण्या आगोदर त्यांना पाण्यातून काढल्याने त्या बचावल्या.
घटनेची माहिती मिळताच चाकूर येथून रुग्णवाहिका आणि अहमदपूर नगर परिषदेची अग्निशमन वाहन घटना स्थळी पोहचले त्यांनी शोधमोहीमेत वाघमारे यांचे प्रेत सापडले. बालाजी वाघमारे यांच्या मृत्यूने भाटसांगवी व चाकूर तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार असून बालाजी वाघमारे हे शेतमजूर म्हणून रोजंदारीवर काम करीत होते. शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.