शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अंतर्गंत स्पर्धात्मक अभियानामध्ये तालुक्यातील राणी अंकुलगा येथील जिल्हा परिषद शाळेने लातूर जिल्ह्यात सर्वप्रथम येऊन शासनाच्या अकरा लाख रुपयांच्या बक्षीसाची मानकरी ठरली आहे.या मुख्यमंत्री माझी शाळा अभियानामध्ये जिल्ह्यात राणी अंकुलगा जिल्हा परिषद शाळेने नावलौकीक केला आहे.
जिल्हा पुरस्कार प्राप्त उपक्रमशील मुख्याध्यापक विठ्ठलराव वाघमारे यांनी सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत कार्यालय राणी अंकुलगा यांच्या सहकार्याने व लोकसहभागामुळे शाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षणासह नाविण्यपूर्ण उपकृम राबविल्यामुळे जिल्हा परिषद राणी अंकुलगा शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
शासन स्तरावर शाळेतील पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी, शैक्षणिक संपादणूक आदी निकषांच्या आधारावर परसबाग, शाळा विकासासाठी विद्यांजली पोर्टलवरील भौतिक सुविधांची मागणी व पुरवठा यांची अंमलबजावणी, स्वच्छता मॉनिटरचे कार्य, स्काऊट गाईडचे उपक्रम, क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरापर्यंतची कामगिरी, असाक्षरांचे सर्वेक्षण, ऑनलाईन शिक्षण, शिष्यवृत्ती परीक्षेतील यश, विद्यार्थ्यांसाठी विविध शासकीय योजनांचा झालेला लाभ, आरोग्य विषयक स्थिती जनजागृती, कार्यालयीन कामकाज, वाचन महोत्सव, वर्ग सजावट, ऐतिहासिक वास्तूचे जतन, शासकीय कार्यक्रमातील सहभाग, दिव्यांगासाठी राबवलेल्या सोयी सुविधा, आधार वैद्यता , सरल प्रणाली, यु – डायस प्रणाली अद्ययावतीकरण इत्यादी महत्त्वपूर्ण उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी शाळेच्या माध्यमातून करण्यात आली होती.
मुख्यमंत्री माझी शाळा अभियान कालावधीत सदर निकषानुसार केंद्रस्तर,तालुकास्तर व जिल्हास्तरावर मूल्यांकन करण्यात आले. यात सर्व निकषांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे जिल्हा परिषद शाळा राणी अंकुलगा जिल्ह्यात गुणांकनामध्ये सरस ठरत या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला.
यामुळे शाळेचा नावलौकिक वाढला आहे. या यशाबद्दल ग्रामस्थ व शिक्षण प्रेमीतून अभिनंदन केले जात आहे.