बंगळूर : वृत्तसंस्था
जगातील श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाच्या लाडूसाठी कर्नाटक सरकार तूप पाठविते. कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या (केएमएफ) ‘नंदिनी’ ब्रँडचे ते दर्जेदार तूप आहे. मात्र, आता लाडूत आढळून आलेल्या जनावरांच्या चरबीमुळे वाद निर्माण झाल्यानंतर कर्नाटक सरकार खडबडून जागे झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तिरुपतीला पाठविण्यात येणा-या तुपाच्या टँकरमध्ये ‘जीपीएस’ आणि इलेक्ट्रॉनिक लॉक सिस्टिम बसविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे.
‘केएमएफ’ तिरुपतीला वर्षाला तीन ते चार हजार टन तूप पाठवत होते. तिरुपतीला २०१३ आणि २०१८ मध्ये तीन हजार टन तुपाची विक्री केली, तर २०१९ मध्ये ती विक्री घटून १७०० टन झाली. पंधरा वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर तूप दिले जात आहे. मात्र गत वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तुपाचा दर अधिक असल्याच्या कारणावरून ‘नंदिनी’ तूप विकत घेण्यास नकार दिला. त्यानंतर पंधरा दिवसांपासून पुन्हा नंदिनी तुपाला देवस्थानने पसंती दिली.
कर्नाटकातून पाठविण्यात येणा-या टँकरमधील तुपात प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये, यासाठी टँकरमध्ये ‘जीपीएस’ यंत्रणा आणि टँकरला इलेक्ट्रॉनिक लॉक सिस्टिम बसविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ओटीपी’शिवाय इलेक्ट्रॉनिक लॉक सिस्टिम उघडणार नाही, याचीही दक्षता घेणार आहे. तीन महिन्यांचे कंत्राट संपल्यानंतर तिरुपती देवस्थान ‘केएमएफ’कडून नियमित तूप विकत घेणार आहे. वर्षाला ३ हजार ५०० टनाचे कंत्राट असेल. त्याची सुरुवात झाली असून काही दिवसांपूर्वी पहिला टँकर पाठविला आहे.