बदलापूर प्रकरणी गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई : प्रतिनिधी
बदलापुरातील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले. तुषार आपटे आणि उदय कोतवाल असे ताब्यात घेण्यात आलेल्या शाळेच्या ट्रस्टींचे नाव आहे. दोन्ही ट्रस्टींना क्राईम ब्रँचने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर पोलिसांकडून आता शाळेच्या ट्रस्टींना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांनाही उद्या गुरुवारी कल्याण कोर्टात हजर करणार आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या संस्थाचालक आणि सचिवांनी हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने दोन्ही आरोपींची याचिका फेटाळली. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. शिवाय न्यायालयाने आरोपींचा शोध घेण्यात तपासयंत्रणेला अपयश येत असल्याचा ठपका ठेवला होता. त्यानंतर आज पोलिसांनी कर्जत येथील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही लपून बसले होते. अखेरीस पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांनी हायकोर्टामध्ये अटकपूर्वी जामीन अर्ज दाखल केला होता. पण हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांना पोलिसांसमोर शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता.