घड्याळ चिन्ह गोठविण्याची मागणी, अजित पवारांची कोंडी करणार?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अजित पवार यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख या आठवड्यात जाहीर होऊ शकते. त्याआधीच शरद पवार यांनी अजित पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या आधी घड्याळ चिन्ह गोठवावे, हे चिन्ह अजित पवार यांच्या पक्षाला मिळू नये, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. आता यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. ऐनवेळी घड्याळ चिन्ह गोठविल्यास अजित पवारांच्या अडचणी वाढू शकतात.
शरद पवार यांच्या पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देऊ नये. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हे चिन्ह त्यांना मिळू नये, त्याऐवजी नवे चिन्ह द्यावे, अशी मागणी केली आहे. अजित पवारांच्या पक्षाने नव्या चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा आणि त्यांच्याकडून मिळालेल्या चिन्हावर निवडणूक लढावी, अशी मागणीही या अर्जात करण्यात आली आहे.
जुलै २०२३ या महिन्यात अजित पवार यांनी ४१ आमदारांना बरोबर घेऊन बंड केले आणि आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहोत, असा दावा केला. त्यामुळे शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे दोन तुकडे पडले. ज्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधात राहिला तर अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत गेला. हा वाद जेव्हा निवडणूक आयोगापुढे गेला, तेव्हा अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने दिले होते. आता शरद पवार यांनी हे चिन्ह गोठवण्यात यावे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नवे चिन्ह द्यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.