मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज घटस्थापनेच्या निमित्ताने दोघेही एकाचवेळी कोराडीच्या देवीच्या मंदिरात एकत्रित आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले. आम्ही राजकीय पक्ष म्हणून इथे आलो नाही, तर आईची मुलं म्हणून एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
नाना पटोले म्हणाले की, कोराडी देवी आमचं कुलदैवत आहे. आम्ही दर नवरात्रीला येत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही राजकीय पक्ष म्हणून इथे आलो नाही, तर आईची मुलं म्हणून एकत्र आलो असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आईकडे विजयाचा आशीर्वाद मागितला. माझ्या नातीचा अन्नप्राशनाचा कार्यक्रम आम्ही इथेच आज केल्याचेही पटोले म्हणाले. आम्ही दोघे भाऊ आहोत, भावासाठी आशीर्वाद मागितला असल्याचे ते म्हणाले. अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून पटोले यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. परवा अमित शहा म्हणाले की, २०२९ मध्ये स्वबळावर सत्ता आणायची आहे. म्हणजे २०२४ मध्ये आम्ही आहोत, असे नाना पटोले म्हणाले.
कुठलीही राजकीय कटुता आज नाही
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, कोराडीच्या आईचा जन्म नाना पटोले यांच्या गावचा असल्याची आख्यायिका आहे. देवीकडे महाराष्ट्रात सुख-संपन्नता नांदू दे अशी प्रार्थना केल्याचे ते म्हणाले. कुठलीही राजकीय कटुता आज नाही, असेही त्यांनी सांगितले.