25 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्रमहिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात राबविणार ‘पंचशक्ती अभियान’

महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात राबविणार ‘पंचशक्ती अभियान’

घटस्थापनेच्या मुहूर्तावर अजित पवार यांची मोठी घोषणा

पुणे : प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणा-या घटना घडत असून यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पंचशक्ती अभियान सुरू करणार असून त्यामध्ये ‘शक्ति बॉक्स’ ही तक्रार पेटी ठेवण्यात येणार असेल असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत घडलेल्या खळबळजनक घटनांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोड मध्ये आले आहेत. पवार यांनी गुरुवारी (दि. ३) पहाटे सहा वाजता वरिष्ठ पोलिस अधिका-यांची बैठक घेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थिनी, महिलांच्या प्रभावी सुरक्षिततेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत ‘पंचशक्ती अभियान’ सुरू केले आहे.

यामध्ये शक्ति बॉक्स, शक्ति कक्ष, शक्ति नंबर, शक्ति नजर, शक्ति भेट या उपक्रमांचा समावेश आहे.शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांसह सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी हे उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. अजित पवार यांनी ‘शक्ति बॉक्स’ ही नवीन हेल्पलाईन सुरू केली आहे. यावरून महिलांची सुरक्षेची अधिक काळजी घेतली जाणार आहे.

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये शक्ति बॉक्स या योजनेबाबत माहिती दिली. या अभियानामध्ये युवकांचे प्रबोधन आणि महिलांची सुरक्षा याबद्दल माहिती दिली जाणार आहे. मुलींचा होणारा पाठलाग, छेडछाड, आयडी लपवून फोन करणं या सगळ्या गोष्टी मुलींना सांगता येतील. खासगी कंपन्या, एस. टी. स्टँड, पोलिस स्टेशन, रेल्वे स्टेशन या आणि अशा सार्वजनिक ठिकाणी शक्ति बॉक्स ठेवण्यात येतील. मुली, महिला यांच्याकडून ज्या तक्रारी येतील त्याची दखल घेतली जाईल. तसेच ज्या महिलेने, मुलीने तक्रार केली आहे त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

शक्ति बॉक्स योजनेबाबत माहिती देताना अजित पवार यांनी सांगितले की, कायदा-सुव्यवस्था व्यवस्थित रहावी असे ज्यांना वाटते त्यासाठीच हा बॉक्स ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शक्ति नंबरही आपण देणार आहोत. ‘एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह’ असं स्लोगन आपण त्याला दिलं आहे. ९२०९३९४९७ हा तो नंबर आहे. यावर एक कॉल केला तर मुली, महिलांना होणारा त्रास सांगता येईल. हा क्रमांक २४/७ तत्त्वावर सुरू असेल. या क्रमांकावर फोन किंवा मेसेज केल्यास त्या तक्रारीचे निवारण करण्याबाबत आणि योग्य ती कारवाई करण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे आणि संबंधित तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
महिलांसोबत चुकीचे प्रकार, गैरप्रकार जर सांगण्यात आले तर त्याचेही निराकरण करण्यात येईल.

शक्ति कक्षही स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये दोन महिला पोलिस अंमलदार असतील. महिला, मुली, बालके यांना भयमुक्त वातावरण देणे हा या कक्षाचा उद्देश असेल. कायदेविषयक मार्गदर्शन करणे या कक्षाचा उद्देश आहे. चौथा भाग आहे शक्ति नजर या माध्यमातून सोशल मीडिया, व्हॉट्स अ‍ॅप स्टेटस, फेसबुक पोस्ट, इन्स्टाग्राम यावर अल्पवयीन, किशोरवयीन मुले शस्त्रे, बंदूक, चाकू यांसह फोटो किंवा व्हीडीओ पोस्ट करतात. असे प्रकार घडले तर तातडीची कारवाई केली जाईल.

शेवटचा भाग आहे शक्ति भेट. या अंतर्गत शाळा, महाविद्यालये, खासगी कंपन्या, एस. टी. स्टँड, महिला वसतिगृह या ठिकाणी भेटी देऊन महिलांना, मुलींना त्यांच्याबाबतचे कायदे. ‘गुड टच’, ‘बॅड टच’ या सगळ्याची माहिती दिली जाणार आहे.
याशिवाय व्यसनाधीनता, बाल गुन्हेगारीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सुसंवाद साधून लैंगिक, शारीरिक, मानसिक छळापासून संरक्षण करून याबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या भेटीचा उद्देश असल्याचे पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR