झरी : महाराष्ट्र शासनातर्फे सन २०२०, २०२१ या वर्षांमध्ये कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या महाराष्ट्रातील शेतकरी व अधिकारी यांना वरळी मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात मिर्जापूर गावचे सरपंच पांडुरंग जाधव यांना महाराष्ट्र शासनातर्फे युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे, दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पांडुरंग जाधव यांना सपत्निक युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मिझार्पूरचे पांडुरंग जाधव हे प्रगतशील शेतकरी असून ७.६० हेक्टर जमिनीवर हळद, सोयाबीन, तूर, ऊस व हरभरा इत्यादी पिके घेऊन त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रायोगिक शेती केल्याने पंचक्रोशीतील शेतकरी त्यांची शेती पाहण्याकरिता मोठ्या प्रमाणात येत असतात.
त्यांनी आत्मा विभाग अंतर्गत २९ शेतक-यांचा समूह तयार करून श्री स्वामी समर्थ सेंद्रिय गट या नावाने २०१६साली शेतकरी गटाची स्थापना केली. त्यांनी त्यांच्या गावामध्ये ४२ शेततळे केली असून त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ सेंद्रिय गट याच्या अंतर्गत २०१६ साली त्यांनी मिनी डाळ मिल सुरू केली. वयाच्या २० व्या वर्षापासून शेती क्षेत्राशी ते निगडित आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.