पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणा-या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यास येत्या सोमवारपासून (ता.७) सुरवात होणार आहे. दहावीची परीक्षा देणा-या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून ऑनलाइन पद्धतीने शाळा प्रमुखांमार्फत भरून घेण्यात येणार आहेत.
तसेच पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयचे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत भरण्यात येतील.
दहावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांचे अर्ज ५ नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहेत.
सर्व माध्यमिक शाळांनी अर्ज भरण्यापूर्वी स्कूल प्रोफाइलमध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज भरून सबमिट केल्यानंतर अर्ज भरायच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिनमधून प्री-लिस्ट उपलब्ध करून दिलेली असेल. माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत अर्ज नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. प्री-लिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी.
त्याचप्रमाणे पडताळणी केल्याबाबत मुख्याध्यापकांनी प्री-लिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यांसह स्वाक्षरी करावी, अशी सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी सरल डेटाबेसमध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे. सरल डेटाबेसवरूनच नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी यांची माहिती सरल डेटाबेसमध्ये नसल्याने
विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत.
कौशल्य सेतू अभियानाचे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट मागणा-या विद्यार्थांनी देखील ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून विषयासमोर ट्रान्स्फर ऑफ क्रेडिटची नोंद करावी. याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी प्रचलित पद्धतीने अर्ज व आवश्यक कागदपत्रे यांची हार्ड कॉपी विभागीय मंडळात जमा करावी, असे ओक यांनी स्पष्ट केले आहे.