25.4 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्रमोदी, शहा यांच्या सभा आमच्यासाठी फायद्याच्या

मोदी, शहा यांच्या सभा आमच्यासाठी फायद्याच्या

शरद पवारांनी काढला चिमटा

सांगली : लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात १८ ठिकाणी सभा झाल्या, त्यातील १४ जागांवर भाजपचा पराभव झाला होता. त्यामुळे आमची पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती असेल की, त्यांनी राज्यात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात. आमच्यासाठी त्या फायद्याच्या ठरतील, असा चिमटा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत काढला.

ते म्हणाले की, अमित शहा यांनी उद्धव ठाकरे व माझ्यावर लक्ष ठेवण्याची सूचना भाजप नेत्यांना केली आहे. पक्ष फोडण्याचे आवाहन ते जाहीर सभेतून करताहेत. देशाचे गृहमंत्रीच कायदा व सुव्यवस्थेविरोधात बोलत असतील तर या सरकारची भूमिका काय आहे, हे सांगायची गरज नाही. जातीय व धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. यासाठी समविचारी पक्ष, चळवळी व संघटनांनी एकसंधपणे याविरोधात लढायला हवे.

आरक्षणप्रश्नी ते म्हणाले की, आरक्षण मिळावे अशा प्रकारची भावना लोकांच्या मनात आहे. ती चुकीची नाही. मात्र हे करत असताना इतरांना जे मिळते त्याचेही रक्षण करणे आवश्यक आहे. मराठीला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पवार म्हणाले की, उशीरा का होईना एक चांगला निर्णय झाला. आजवर ज्यांनी मराठीत दर्जेदार लेखन केले व नव्या पिढीतील साहित्यिकांना काही लिहायचे असेल तर त्यांना या निर्णयाने प्रोत्साहन मिळेल. जागतिक स्तरावर आपले साहित्य नेण्याचा मार्गही गवसला आहे. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारचे याबाबत अभिनंदन करतो.

आरक्षण मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवा
तमिळनाडूमध्ये आरक्षण ७८ टक्क्यांपर्यंत होते. महाराष्ट्रात ७५ टक्क्यांपर्यंत का होऊ शकत नाही? केंद्र शासनाने कायद्यात दुरुस्ती करुन आरक्षण टक्का वाढविल्यास मराठा समाजासह सर्व समाजघटकांचे प्रश्न सुटू शकतात. याबाबतीत आम्ही त्यांना पाठींबा देऊ.

तिस-या आघाडीने धास्ती
राज्यात निर्माण होऊ पाहणा-या तिस-या आघाडीची खिल्ली उडविताना पवार म्हणाले, मोठ्या ताकदीचे नेते असा प्रयत्न करताहेत. राज्याच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही घाबरलो आहोत.

आंबेडकरांना एकही जागा जिंकता येत नाही
मराठा आरक्षणाला पाठींबा दिल्याने शरद पवार आता मराठ्यांचे नेते आहेत, हे सिद्ध झाले, अशी टीका अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. त्यावर पवार म्हणाले की, ज्यांना राज्यात एकही
जागा निवडून आणता येत नाही, ते प्रसिद्धीसाठी अशी टीका करीत असतात.

पंतप्रधानांचाच रेवडी संस्कृतीला विरोध
फुकटच्या योजनांविरोधात नितीन गडकरींनी केलेले विधान योग्यच आहे. त्यांना प्रशासकीय वास्तव माहित आहे. केवळ त्यांनीच नव्हे तर पंतप्रधान मोंदी यांनीही अशा संस्कृतीला ‘रेवडी’ संबोधत त्याला विरोध केला होता, अशी आठवण शरद पवार यांनी करुन दिली.

येणा-या लोकांचे स्वागत
काही लोकांचा रस्ता चुकला होता. त्यांना त्याचा पश्चाताप झाला. आता ते योग्य रस्त्यावर येऊ पाहताहेत. आम्ही त्यांचे स्वागत करू असे पवार यांनी स्पष्ट केले.

वय वाढेल तशी उर्जा वाढतेय
पत्रकारांनी त्यांच्या राजकीय उर्जेबाबत विचारल्यानंतर ते म्हणाले, वय वाढेल तशी उर्जा वाढतेय. त्यामुळे पक्षीय कार्य चांगल्या पद्धतीने सुरु आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR