कोल्हापूर : प्रतिनिधी
सध्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यात सत्ताधारी-विरोधकांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सध्या महागाईने उच्चांक गाठला असून १६०० रुपयांचा तेलाचा डबा २४०० रुपयांवर गेला. लाडक्या बहिणीला दिले किती आणि लाडक्या बहिणीकडून काढून घेतले किती याचा हिशेब बहिणींनी करावा, असा टोला शिवस्वराज्य यात्रेत गडहिंग्लज तालुका पंचायत समितीचे माजी अध्यक्ष अमर चव्हाण यांनी सरकारला लगावला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. गडहिंग्लज तालुक्यातील नेसरीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली.
शिवस्वराज्य यात्रेत गडहिंग्लज तालुका पंचायत समितीचे माजी अध्यक्ष अमर चव्हाण यांनी तडाखेबंद भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणातून चांगलीच टोलेबाजी केली. ते म्हणाले की, महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी आहे, गद्दारांसोबत जाणार नाही. ईडी हा शब्द तुम्हाला आणि मला कधी बघायला मिळाला? या दहा-पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये मिळाला. उसाला पाणी पाजले आहे, ज्यांनी शेतात नाचणा लावला, रताळी लावली त्याच्याकडे येणार नाही.
ज्यांनी लावलेली रताळी मोडून खाल्ली त्याच्याकडे ईडी येऊ शकते. म्हणून गद्दार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात आहे, त्यांनी ‘लाडकी बहीण योजना’ आणली. आज राज्य कोणत्या दिशेने चालले आहे. ते म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्याने सांगितले, १६०० रुपयांचा तेलाचा डबा २४०० रुपयांना गेला. लाडक्या बहिणीला दिले किती आणि लाडक्या बहिणीकडून घेतले किती याचे कॅल्क्युलेशन करणे गरजेचे आहे. गॅसची टाकी फुकट दिली, पण काँग्रेसच्या काळात चारशे रुपयाला मिळणा-या सिलिंडरला आता अकराशे रुपये मोजावे लागत आहेत.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, एसटी महामंडळात जशी विमानामध्ये एक ‘परी’ ठेवलेली असती तशी ‘एसटी परी’ ठेवणार म्हणतात. आमच्या गडहिंग्लज डेपोची अवस्था तर बघून घ्या. चंदगडपर्यंत जावा किमान दोन एसटी बंद पडलेल्या दिसतात. या सरकारला आमचे आवाहन आहे ती ‘सुंदरी’ नको आमच्या एसटीच्या किमान टायरी घाला. आमची पोरगी सकाळी सहाला उठून एसटीला उभारते आणि त्या पोरीला एसटी मिळत नाही, तिचे कॉलेज चुकत आहे. तुमच्याकडून ती परी बघायची इच्छा नाही. आमची घरातली परी शाळेला चालली. या परीला वेळेत पोहोचवा आणि त्या परीला वेळेत घरला आणा. आम्हाला सुंदर प-या बघायची गरज नाही. माझ्या जन्माला आलेली पोटाची तीच पोरगी माझी परी आहे. त्या परीला सुरक्षित ठेवा. ती परी माझी सुरक्षित नाही.