बीड : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बीड जिल्ह्यातील अर्जुन कवठेकर या तरुणाच्या कुटुंबियांची आज मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली.यावेळी पीडित कुटुंबाला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. बाबांनो आत्महत्या करू नका, मी आरक्षण देईनच असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार असल्याचेही जरांगे म्हणाले.
मराठा समाजाला सरकार आरक्षण देत नाही, सरकार शब्द पाळत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून अर्जुन कवठेकर या तरुणाने आज गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आत्महत्याग्रस्त तरुणाच्या कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. कोणीही आत्महत्या करू नका. मी आरक्षण देण्यास समर्थ आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार
अर्जुन कवठेकर या तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही जबाबदार आहेत. आता मी यांना सोडणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. आरक्षण कसे देत नाहीत हे मी पाहतो. मात्र तरुणांनी आत्महत्या करून कुटुंब उघड्यावर आणू नये असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. बीडच्या जिल्हा परिषद कार्यालय परिसरात झाडाला गळफास घेत अर्जुन कवठेकर यांनी जीवन संपवले आहे.