24.7 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रगुन्हेगारांना पाठीशी घालणा-या फडणवीसांनी राजीनामा द्यावा : नाना पटोले

गुन्हेगारांना पाठीशी घालणा-या फडणवीसांनी राजीनामा द्यावा : नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गुन्हेगारीसंदर्भात महाराष्ट्र देशात दुस-या क्रमांकावर गेला आहे. महाराष्ट्राचा नंबर खुनाच्या केसेसमध्ये तिसरा असून लैंगिक अत्याचारांत चौथा आहे. २०२२ मध्ये महाराष्ट्रात एकूण ३,७४,०३८ एवढे गुन्हे दाखल झाले आहेत. यातील बरेचसे गुन्हे नोंदवलेच गेले नाहीत, राजकीय दबावामुळे कायमचे दाबले गेले आहेत. याच संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला.

सत्ता असेल तर माणूस काहीही करू शकतो आणि कोणत्याही गुन्ह्यातून मुक्त होऊ शकतो, असे मत महाराष्ट्रातील राजकारण पाहून जनतेचे झाले आहे. रोजच नवीन प्रकारचे गुन्हे घडताना आपल्याला दिसून येतात. २०२२ च्या उत्तरार्धात महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढायला सुरुवात झाली होती. त्या वर्षात ८,२१८ दंगलीच्या घटनांची नोंद झाली, जी त्या वर्षातील देशातील सर्वाधिक आहे.

राजकारणात अनेक गुन्हेगारांचा समावेश असल्याचे चित्र आपण पाहतो. गुन्हेगार व्यक्ती एखाद्या मोठ्या पक्षाकडून निवडणूक लढवत असते आणि पर्याय नसल्याने ब-याचदा आपण अशा व्यक्तीला निवडूनसुद्धा दिलेले असते पण असे नेते जनतेचे सेवक नसून भक्षक बनतात. सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर करत समाजात वावरत असतात. महाराष्ट्रात ‘बड्या बापाच्या औलादींच्या’ एवढ्या घटना घडल्या आहेत ज्यात सामान्य माणसाला न्याय मिळणं तर लांबची गोष्ट, माणुसकीसुद्धा जपता आली नाही.

पुण्यातील मोठे बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाने पोर्शे कारने दुचाकीस्वारांना धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अपघात घडताच पोलिसांनी वेदांतला ताब्यात घेतले. त्याच्या वडिलांनी विलंब न करता निव्वळ १५ तासांत जामीनसुद्धा मंजूर करून घेतला आणि न्यायालयाने त्या मुलाला अपघातावर निबंध लिहिण्याची शिक्षा दिली. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आणि पोलिसांच्या भूमिकेकडेही संशयाने पाहिले जाऊ लागले.

शिवसेना उपनेते राजेश शहा यांच्या बाबतीत अशीच घटना घडली. वरळीला पहाटेच्या वेळी आरोपी मिहिरने कावेरी नाखवा यांना गाडीने धडक दिल्यानंतर त्याने त्यांच्या वडिलांना फोन लावला. गाडी चालक चालवत होता असे सांगू, तू तिथून पळून जा.. असा सल्ला राजेश शहा यांनी मिहिरला दिला. आरोपीला लपवून ठेवण्याच्या गुन्ह्यासाठी राजेश शहा यांना अटक करण्यात आली.

कावेरी व तिचा पती प्रदीप नाखवा दुचाकीवरून प्रवास करत होते. तेव्हा अ‍ॅनी बेझंट रोडवर मिहिरने आपल्या कारने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यावेळी प्रदीप मोटारगाडीच्या बोनेटवर पडले, तर कावेरी मोटारगाडीच्या समोर पडल्या. परंतु गाडी थांबवायची सोडून आरोपीने कार भरधाव वेगाने नेली. सोबत कावेरी यांना फरफटत नेले. चालक आणि मिहिरने पुढे जाऊन गाडी थांबून कावेरीचा मृतदेह रस्त्यावर फेकला व ते पुढे निघून गेले.

असाच काहीसा प्रकार भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या बाबतीत घडलेला दिसतो. नागपुरात एका रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वेगातील एका ऑडी कारने दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिल्याचे प्रकरण समोर आले. अपघातील कार ही बावनकुळे यांच्या मुलाची असल्याचे समोर आले आहे. सर्वसामान्यांना न्याय वेगळा आणि नेत्याच्या मुलाला वेगळा? असा प्रश्न या प्रकरणामुळे उद्भवतो. राहुल गांधी यांच्या आरक्षणा संदर्भातील वक्तव्यावर भाजपचे नेते तरविंदर सिंह मारवाह यांनी राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हे लोकशाहीतल्या कुठल्याच नेत्याला शोभण्यासारखे नाही, या शब्दांत नाना पटोलेंनी आपले मत व्यक्त केले.

लहान मुलींवर अत्याचारांच्या घटना वाढल्या
एका लहान मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार होतो आणि त्या गुन्ह्याची नोंदसुध्दा पोलिस करत नाहीत. कारण ज्या शाळेत हे प्रकरण झाले ती शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिका-यांची आहे. त्यामुळे भाजप सरकारशी संबंधित लोकांचे लागेबांधे त्यात आहेत, या शब्दांत नाना पटोले यांनी बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी आपला राग व्यक्त केला.

सरकारकडून गुन्हेगारांना संरक्षण
सरकार गुन्हेगारांना संपूर्ण सुरक्षा देत आहे. श्रीमंतांच्या मुलांना वाचवून मध्यमवर्गीयांना पिळवटलं जातंय. म्हणूनच ‘हिट अँड रन’चे आरोपी महाराष्ट्रात मोकळे फिरत आहेत. अधिका-यांवर हल्ले होत आहेत. महाराष्ट्रातील कायदेशीर स्थिती बिकट आहे, असे नाना पटोले म्हणाले. देवेंद्र फडणवीसच स्वत:चा वकील वापरून गर्भश्रीमंतांच्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR