बोरी : परभणी ते जिंतूर महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. या महामार्गाच्या एका बाजुच्या नाल्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बसस्थानक परीसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच नाल्यांचे काम अर्धवट असल्याने काल झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी दुकानात शिरल्याने व्यापा-यांची तारांबळ उडाली. त्यामुळे नाल्यांचे काम तात्काळ करण्यात यावे अशी मागणी नागरीकातून होत आहे.
परभणी ते जिंतूर महामार्ग लगत दोन्ही बाजूला सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाल्या काम करण्यात येणार आहे. परंतू गेल्या चार ते पाच वर्षापासून हे काम संथ गतीने सुरू आहे. एका बाजूला नाल्याचे काम पूर्ण झाले आहे. दुस-या बाजूला नाल्याचे काम कधी सुरू होणार आहे अशी व्यापारी व बसस्थानक परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. दिवाळी झाल्यानंतर नाल्याचे काम सुरू होणार अशी चर्चा होती.
परंतू दिवाळी उलटून पंधरा दिवस झाले तरी नालीचे काम सुरू होण्याचे चिन्ह दिसत नाही. नाल्या अभावी बसस्थानक परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात दिसून येत आहे. उघड्या नाल्यामुळे डास, मलेरिया, डेंगू, साथीचे रोग पसरण्याचे प्रमाण सध्या जास्त दिसत आहे. त्यामुळे नाल्याचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे अशी नागरिकांतून मागणी होत आहे.