कोलकाता : वृत्तसंस्था
आरजी कार मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणी तळा पोलिस स्टेशनमधील या प्रकरणाशी संबंधित काही पुराव्यांमध्ये बदल करण्यात आले असून बनावट नोंदी आढळल्या आहेत, असा गौप्यस्फोट सीबीआयने केला आहे. सीबीआयने कोलकाता येथील विशेष न्यायालयात ही माहिती दिली. त्यांनी पोलिस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत आणि ते तपासणीसाठी सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (सीएफएसएल) कोलकाता येथे पाठवले आहेत.
तळा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभिजित मोंडल आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या चौकशीदरम्यान प्रकरणाशी संबंधित काही बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर सीबीआयने पोलीस ठाण्यातील पुरावे बदलल्याचा आरोप केला असून खोटे रेकॉर्ड तयार करण्यात आल्याचेही म्हटले आहे.