18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयसंमेलनाध्यक्षपदी डॉ. भवाळकर

संमेलनाध्यक्षपदी डॉ. भवाळकर

राजधानी दिल्लीत रंगणार ९८ वे साहित्य संमेलन

पुणे : प्रतिनिधी
दिल्लीत होणा-या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ महिला साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली. पुण्यात साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी ही घोषणा केली. डॉ. तारा भवाळकर या लोक संस्कृतीच्या अभ्यासक असून, ९८ वर्षांच्या इतिहासात त्या सहाव्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. पाचव्या अध्यक्षा अरुणा ढेरे या होत्या.

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी तालकटोरा स्टेडियम, दिल्ली येथे होणार आहे. ७० वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविले होते. त्यानंतर यंदा दिल्लीत होणा-या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान डॉ. भवाळकर यांना मिळाला आहे. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावे पुढे आली होती. यात डॉ. तारा भवाळकर आणि विश्वास पाटील यांचे नाव अखेरपर्यंत कायम राहिले. अखेर भवाळकर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाले.

या बैठकीस अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, राजन लाखे, प्रदीप दाते, विलास मानेकर, गजानन नारे, दादा गोरे, रामचंद्र कालुंखे, किरण सगर, कपूर वासनिक, संजय बच्छाव, विद्या देवधर उपस्थित होते. पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, ध्वजारोहण आणि ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. दुस-या दिवशी सकाळी एका नामवंताची मुलाखत आणि विविध विषयांवर परिसंवाद होणार आहे. त्यानंतर तिस-या दिवशी समारोप होणार असल्याचेही यावेळी सांगण्या आले.

विपूल वैचारिक लेखन
डॉ. तारा भवाळकर यांचा जन्म १ एप्रिल १९३९ रोजी झाला. वैचारिक लेखन करणा-या त्या एक मराठी लेखिका आहेत. प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला विषयांचे लेखन आणि त्यांचा गाढा अभ्यास आहे. लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला आणि स्त्री जाणिवांवर भाष्य करणारे लेखन त्यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR