लातूर : प्रतिनिधी
जुन्या लातूर भागातीलच नव्हे तर संपूर्ण लातूरवासियांचे श्रद्धास्थान असणा-या स्वयंभू श्री केशवराज मंदिरच्या भक्तनिवास पुनर्बांधणी व विस्तारीकरणाचे काम लातूरमधील सर्वात उत्कृष्ट आणि भव्य-दिव्य स्वरुपाचे होईल, असा विश्वास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त्त केला आहे.
लातूर शहरातील पुरातन व स्वयंभू श्री केशवराज मंदिरच्या भक्तनिवास पुनर्बांधणी व विस्तारीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ दि. ७ ऑक्टोबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ यज्ञमार्तंड प. पू. यज्ञेश्वर रंगनाथ महाराज सेलूकर यांच्या हस्ते तर उद्घाटन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, लातूर मनपाचे आयुक्त्त बाबासाहेब मनोहरे, श्री केशवराज मंदिरचे अध्यक्ष अॅड. संजय पांडे, उपाध्यक्ष बजरंगलाल रांदड, सचिव अशोकराव गोंिवदपूरकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी आपल्या मार्गदर्शनात दिलीपराव देशमुख यांनी माणूस धार्मिक असावा, धर्मनिष्ठ असावा, पण धर्मांध नसावा असे सांगितले. हिंदू धर्मातही त्याग, क्षमा, करुणा आहे. या सगळ्या गोष्टींचे जतन करणे हे या धर्माचे सर्वात मोठे यश आहे. श्री केशवराज मंदिराला एक प्राचीन इतिहास आहे. या मंदिराच्या माध्यमातून विविध सामाजिक जबाबदा-याही पूर्ण केल्या जातात, ही अतिशय महत्वाची बाब आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडे पुरातत्व खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी असताना त्यांनी या मंदिराच्या विकासासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर केला होता. त्या कामाचा शुभारंभ आज झाल्याचे त्यांनी सांगितले. भक्तनिवास पुनर्बांधणी व विस्तारीकरणाच्या या कामासोबतच मंदिराच्या बाजूच्या मोकळ्या जागेच्या विकास कामाचाही प्लॅन करावा. ते कामही पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करु, असे दिलीपराव देशमुख यांनी स्पष्ट
केले.
लातूरच्या राजकीय क्षेत्रात वावरताना आपण राजकीय संस्कृती जपलीय. प्रत्येकाने आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्राच्या संस्कृतीचे, त्याच्या धर्माचे पालन करणे आवश्यक असते, असे सांगून त्यांनी यावेळी सुसंस्कृतपणा, नैतिकता, भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचरण यावर अत्यंत मौलिक विचार माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी आपले विचार व्यक्त करताना आज समाजकारणात, धर्मकांडातही भ्रष्टाचार होताना दिसतोय हे सांगताना त्यांनी तिरुपतीच्या लाडू प्रकरणाचा विषय उपस्थित केला. राज्यातील विद्यमान सरकारचा पायाच भ्रष्टाचार आहे. अशा भ्रष्ट सरकारला जनता कंटाळली आहे. त्यामुळे येणा-या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारुढ होईल,असा विश्वासही माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त्त केला.
यावेळी अॅड. संजय पांडे, यज्ञेश्वर रंगनाथ महाराज, आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक करताना अशोक गोविंदपुरकर म्हणाले की माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री असताना श्री केशवराज मंदिराला अडीच कोटी रुपयांचा निधी दिला. लोकनेते विलासराव देशमुख यांनीही या मंदिराला न मागता निधी दिला केशवराज भगवानाच्या दर्शनाला लातूर शहरातील व्यक्त्ती पिढ्यान पिढ्यांपासून येतात. लातूर शहरातील सिद्धेश्वर व केशवराज मंदिर हे पुरातन मंदिर आहेत असे ते म्हणाले. सूत्रसंचलन बसवंतआप्पा भरडे यांनी केले तर शेवटी आभार योगेश उन्हाळे यांनी मानले.