मुंबई : शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. उद्धव ठाकरे हे देखील आमच्यासाठी आदरणीय आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की आम्ही सर्वच बाबतीत त्यांच्या हो ला हो म्हणू. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप हे मेरिटवरच व्हायला हवे अशी रोखठोक भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडली.
महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे, मात्र अद्याप तोडगा निघाला नसल्याचे दिसत आहे. जागावाटप काँग्रेसच्या मनासारखे होत आहे का? असा प्रश्न मुलाखतीदरम्यान नाना पटोले यांना विचारण्यात आला होता. त्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना पटोले यांनी म्हटले की, महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल आमची भूमिका अतिशय साधी आणि सरळ आहे. मेरिटच्या आधारावर जागावाटपाचा निर्णय व्हावा असे आमचे मत आहे.
जेणेकरून आपल्या महाराष्ट्राला विकणारे सरकार सत्तेतून बाहेर काढता येईल. सत्ताधा-यांचे चमत्कार फारच गंमतीशीर आहेत. मुख्यमंत्री दावोस दौ-यावर गेले आणि आता तिथेही कर्ज करून आले. तिथल्या एका कंपनीने यांना नोटीस पाठवली असून कर्ज भरण्याची सूचना केली आहे. हे जिथं जातात तिथं कर्ज करून येतात. आता बुधवारी सरकारने निर्णय घेतला आणि ३० हजार कोटी रुपयांचा ओव्हरड्राफ्ट केला. म्हणजे आता सरकारला कर्मचा-यांचे पगारही कर्जातून करावे लागणार आहेत. हे असे बिनकामी सरकार, शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही सरकार सत्तेतून बाहेर काढण्याचा काँग्रेसचा संकल्प आहे. त्यामुळे हे सरकार मुळासकट उखडून फेकण्यासाठी जागावाटप मेरिटच्या आधारे व्हावे अशी आमची भूमिका आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पवार आणि ठाकरेंचा सन्मानच
लोकसभा निवडणुकीत सहानुभूतीचा काँग्रेसलाही मोठा फायदा झाला आहे, यावर काँग्रेसची भूमिका काय? त्यावर नाना पटोले म्हणाले, आम्ही मान-सन्मानच देत आहोत. ज्या भाजपने यांची घरं फोडली, यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, त्यांना सत्तेतून बाहेर काढण्याचाच काँग्रेसचा विचार आहे. त्यामुळे भाजपला सत्तेतून बाहेर काढायचे असेल तर मेरिटवर निर्णय घ्यावा आणि या नेत्यांचा सन्मानही त्यातच आहे. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. उद्धव ठाकरे हेदेखील आमच्यासाठी आदरणीय आहेत.
मतविभाजन टाळणार
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांचे मतविभाजन होणार नाही, यासाठीचा प्लॅन आमच्या तीनही पक्षांकडे तयार आहे. जागावाटप झाल्यानंतर तो प्लॅन आम्ही जाहीर करू अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.