पुणे : प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जागावाटप होण्यापूर्वीच काही जागांवर उमेदवार घोषित केले जात आहेत. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जागावाटपावर भाष्य करताना पुण्यातील हडपसर मतदारसंघातील उमेदवारच घोषित केला आहे. येथील मतदारसंघातून महादेव बाबर हे विधानसभा निवडणूक लढणार आहेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच थेट सामना होणार आहे. त्यामुळे, दोन्ही आघाड्यांमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून बहुतांश जागांवर एकमत झाले आहे.
त्यामध्ये, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज आणखी एक उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तत्पूर्वी, आमदार रोहित पवार व समरजित घाटगे यांचीही उमेदवारी जाहीर झाली होती. शिवसेना ठाकरे गटाकडूनही उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. सुषमा अंधारे यांनी पुण्यातील जागावाटप व मतदारसंघाबाबत माहिती दिली.
तसेच, पुणे जिल्ह्यातील इतर काही जागांबाबत चर्चा सुरू आहे, पुण्यात १५ ते १८ जागांबाबत निर्णय राहिला आहे. तर, ७ ते ९ जागांवर एनसीपीएसपी व उबाठा आणि इतर जागांवर काँग्रेस अशी चर्चा झाल्याची माहिती अंधारेंनी दिली. त्यामुळे, पुण्यातील जागावाटपाचे गणितच अंधारेंनी उलगडले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र, महाविकास आघाडीत हडपसरची जागा ही शिवसेना यूबीटी उमेदवाराचीच असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे, महाविकास आघाडीमधील दोन्ही पक्ष यास मान्यता देतील का, हे पाहावे लागेल.
नीलम गो-हेंनी निवडणूक लढवावी
नीलम गो-हे यांनी निवडणूक लढवावी, त्यांची पत किती आहे हे बघावे. मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण म्हणून त्यांना उमेदवारी द्यावी. नीलम गो-हे यांच्या विरोधात का लढावे, त्यांचा माझा काहीही संबंध नाही. वशिल्याने कोणी पुढे गेले तर ते हुशार असतात, असे नाही, असे म्हणत सुषमा अंधारेंनी नीलम गो-हेंवर जोरदार हल्लाबोल करत त्यांना चॅलेंजही दिलंय.