कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुभेंदू अधिकारी यांना विधानसभेच्या संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार तापस राय यांनी सुभेंदू अधिकारी यांना विधानसभेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला.
त्यांनी त्यांच्या प्रस्तावात म्हटले आहे की, संविधान दिनाच्या ठरावावरील चर्चेदरम्यान, अधिकारी यांनी सभागृहात घोषणाबाजी केली, त्यापूर्वी त्यांनी आणि इतर भाजप आमदारांनी सभापतींच्या इशाऱ्यानंतरही सभागृहातून बाहेर पडले.
मंगळवारी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच चर्चेने गदारोळाचे स्वरूप घेतले होते. तृणमूलचे आमदार तपस रॉय यांनी विरोधी पक्षनेत्याला सभागृहातील असंसदीय वर्तनासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला सत्ताधारी पक्षातील इतर आमदारांनी पाठिंबा दिला. त्यानंतर शुभेंदू अधिकारी यांना निलंबित करण्यात आले.
यापूर्वी २८ मार्च २०२२ रोजी शुभेंदू यांच्यासह भाजपच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले होते. त्या अधिवेशनापूर्वी भाजपच्या दोन आमदारांना निलंबित करण्यात आले होते. भाजपच्या एकूण सात आमदारांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले.