जालना : जालना जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. घनसावंगीतील ठाकरे गटाचे नेते हिकमत उढाण हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. १० ऑक्टोबर रोजी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
हिकमत उढाण यांनी शिवसेनेच्या तिकिटावर घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून दोनदा निवडणूक लढवली आहे. गेल्या निवडणुकीत ते शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्याकडून अवघ्या ३ हजार ४०९ मतांनी पराभूत झाले होते. यंदाही त्यांनी टोपे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. यामुळे ते १० तारखेला शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. घनसांवगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील हिकमत उढाण यांच्या साखर कारखान्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून, याच कार्यक्रमात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
दरम्यान, आज जम्मू-काश्मीर आणि हरियाणा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर केल्या जाऊ शकतात. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडी आणि महायुतीमधील कोणत्या घटक पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र दुसरीकडे काही नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करताना दिसत आहेत.