नवी दिल्ली : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना चाहते प्रेमाने मिथून दा म्हणतात. डान्सिंग सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांना सिनेजगतातील सर्वांत प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिल्लीत आज ७० वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी मिथुन दा यांना या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, मला याआधी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पहिल्यांदा मिळाला तेव्हाचे त्याचे अनेक किस्से आहेत. पहिला पुरस्कार मिळाला तेव्हा यश डोक्यात गेले होते. फिल्म इंडस्ट्रीत काळा रंग चालणार नाही असे मला म्हटले गेले. खूप अपमान झाला. तेव्हा विचार करायचो की मी काय करू. देवाला विचारायचो माझा रंग बदलू शकत नाही का? मग मी विचार केला की मी डान्स करु शकतो. मग मी ठरवले की मी असा डान्स करेन की कोणाचेच लक्ष माझ्या काळ्या रंगाकडे जाणार नाही. मग मी बनलो सेक्सी, डस्की बंगाली बाबू. मी देवाकडे खूप तक्रार करायचो की मला सगळ्यासाठीच संघर्ष करायला लागतोय. आज हा पुरस्कार मिळाल्यानंतर मी तक्रार करणे सोडून दिले.
मिथुन चक्रवर्तींची कारकीर्द
मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म १६ जून १९५० रोजी झाला. कोलकातामधील बंगाली हिंदू कुटुंबात मिथुन यांचा जन्म झाला. पुण्यातील एफटीआयआयमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले आहे. मृणाल सेन दिग्दर्शित ‘मृग्या’ या सिनेमातून मिथुन चक्रवर्तींनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. डिस्को डान्सर या सिनेमात मिथुन यांनी केलेला अभिनय आणि डान्स चांगलाच गाजला. या सिनेमातून डिस्को डान्सर नावाने मिथुन यांना ओळखले जाऊ लागले. मिथुन यांनी अभिनयक्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्रही गाजवले आहे. सध्या ते भारतीय जनता पार्टीत सक्रीय आहेत. मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण, पद्माश्री पुरस्कारही मिळाला आहे. तसेच हा त्यांचा चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे.