परभणी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, नवरात्रा दुर्गा महोत्सव व धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून परभणी शहरात शुक्रवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय परभणी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील १ हजार खेळाडूंचा सहभाग असणार आहे. यावेळी सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती स्पर्धेचे संयोजक तथा काँग्रेस कमिटी अनु. जाती विभाग प्रदेशाध्यक्ष डॉ. सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी दिली.
मॅरेथॉन स्पर्धेची माहिती देण्यासाठी मंगळवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. माधव शेजूळ, रणजित काकडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना स्पर्धा संयोजक डॉ. हत्तीअंबीरे म्हणाले की, या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता होणार आहे. या प्रसंगी नांदेड परीक्षेत्र पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नितीशा माथुर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. अशोक सोनी, आंतरराष्ट्रीय धावपटु ज्योती गवते, शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त मंगल पांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेच्या समारोपानंतर सकाळी ८.३० वाजता बक्षीस वितरण कार्यक्रमास खा. संजय जाधव, आ. सुरेश वरपूडकर, आ. डॉ. राहूल पाटील, माजी आ. विजय भांबळे, डॉ. सिध्दार्थ भोराव, बाळासाहेब देशमुख आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. महाराष्ट्र ऍथलेटिक्स असोसिएशन व परभणी जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. डॉ. माधव शेजुळ, प्रा. डॉ. गुरूदास लोकरे, रणजित काकडे यांच्या नियंत्रणाखाली १०० तज्ज्ञ पंचाची नियुक्ती या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. ३, ६ व १० किमी अंतराच्या स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या १० क्रमांकाच्या विजयी खेळाडुंना २ लाख रूपयांची रोख बक्षीस देण्यात येणार असून ही स्पर्धा शहरातील विविध रस्त्यावरून आयोजित केली आहे. मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन स्पर्धा संयोजक डॉ. हत्तीअंबीरे यांनी केले आहे.