राणीसावरगाव : राणीसावरगाव येथील डोंगराळ भागात वसलेले श्री रेणुका देवीचे मंदीर आणि राणुबाईच्या नावावरून गावास राणीसावरगाव हे नाव मिळालेले आहे. हेमाडपंथी ऐतिहासिक बांधकाम जुन्या मानसामध्ये अंदाजे सात पिढ्या पुर्वीचे हे मंदीर आहे अशी चर्चा आहे. श्री रेणुका देवीचे मंदिर मराठवाड्यातच नव्हे तर महाष्ट्रात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी विश्वस्त म्हणून गळाकाटु कुंटूबातील वंशज काम पाहतात. येथे प्रतिवर्षी नवरात्र उत्सव मोठया उत्साहात साजरा होतो.
प्रतिवर्षा प्रमाणे श्री रेणुका देविचा शारदीय नवरात्र महोत्सवास अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दि.३ ऑक्टोबर यात्रा प्रारंभ घटस्थापनेने झाला आहे. या दिवशी देविच्या मंदीरातील घटस्थापने बरोबरच सर्व गावातील प्रत्येक घरात घटस्थापना होऊन नऊ दिवस उपवास (पारणे) केले जातात. राणीसावरगावच्या रेणुकादेवीला माहूर व तुळजापुरच्या देवीचे ठाण समजले जाते. माहूर व तुळजापूरला गेलेला प्रत्येक यात्रेकरू राणीसावरगाव येथे जरूर येतो.
नवसाला पावणारी देवी आशी अख्याईका आहे. या यात्रेला लातूर ,नांदेड, परभणी, बिड जिल्हयातून तसेच शेजारील राज्यातून हजारोंच्या संखेने भाविक दर्शनास येत असतात. दर्शन व्यवस्थीतपणे व्हावे म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावलेला असतो.
येथे अष्टमीच्या होम हवण कार्यक्रमास विशेष महत्त्व असते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात. हा कार्यक्रम पाण्यासाठी महिला पुरुष रात्रभर जागे राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतात.
शेवटच्या दिवशी दसरा पालखी सिमोलंघन (परशुरामाची मिरवणुक) असते. सर्व गावकरी सिमोलंगनासाठी पालखी सोबत माळावरील मुळपीठ देवी मंदीरावर जमतात. श्री रेणुका देवीचे मूळ स्थान असणारी मूळपीठ देवी मात्र पंचक्रोशीच्या बाहेर फारशी परिचीत नाही. गावाच्या बाहेर पूर्वेस १ कि. मी. अंतरावर एका माळावर मूळपीठ देवी विराजमान आहे. आज तो माळ मूळपीठ देवीचा माळ म्हणून प्रसिद्ध आहे. रेणुका देवीचे माळावरुन गावात आवतरण कसे झाले या संदर्भात राणुबाईची कथा जनमानसात आजही प्रसिद्ध आहे.
राणुबाईच्या घरी जाण्यास निघालेली देवी तिच्या संशयामुळे घरी न जाता वाटेतच थांबली. देवी येत नाही हे पाहून राणुबाईने सुद्धा देवी पासून काही अंतरावर देह ठेवला. आज ते ठिकाण पादुका मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. मूळपीठ देवीच्या दर्शनासाठी सुमारे १ कि. मी. अंतर पार केल्यावर देवीच्या माळाच्या पायथ्याशी आपण पोहचतो. छोटासा डोंगर ६२ पाय-या चढून वर पोहचल्यावर दोन्ही बाजूला काहिशा १० फुटांच्या मजबूत दिपमाळी आहेत. आपण देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करतो. छोटेखानी, मजबूत बांधणीचे गावातील इतर प्राचीन मंदिरांच्या तुलनेत उत्तरकालीन बांधकाम, त्यावरील मुस्लीम वास्तुकलेचा जाणवणारा प्रभाव घुमटाच्या रूपात पाहायला मिळतो.
शेजारी माळावर रावण दहन कार्यक्रम असतो. तेथून पालखी केदारेश्वर मंदीर व तेथून निघून नंतर पुर्ण गावातून पालखीची मिरवणुक बँड बाजाच्या गजरात व पोथ खेळत निघते. गावातील स्त्रिया जागोजागी पालखीची आरती करण्यासाठी ताठ घेऊन तयार असतात. शेवटी शनीमंदीरापासून देविच्या मंदीरात येऊन आरती होऊन पालखीची सांगता होत असते. या नंतर दूसरे दिवशी गोंधळाने कार्यक्रमाची सांगता होते.
या देवस्थानाला तिर्थक्षेत्राचा (ब) दर्जा मिळाला असून पुर्वीप्रमाणे संस्थानाकडून कुस्ती व इतर खेळाचे सामने याचे आयोजन केले जाते. येथे येणा-या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी मानकरी व सेवेकरी व इतर स्वंय सेवक कार्यक्रमात सहभागी होत असतात.