लातूर : प्रतिनिधी
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून माझ्याकडे कार्यभार होता. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेजारी सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल ३०० खाटाचे आहे. १०० कोटींचे या रुग्णलयाचे विस्तारीत अद्ययावत १८९ खाटांचे रुग्णालय शहरातील गावभागातील पटेल चौक येथे व्हावे यासाठी प्रयत्न केले आणि त्याला आज मुर्तरुप आल्याचे आपण पाहतो. सर्वसोयींनी युक्त असे हे अद्ययावत रुग्णालय लवकरच रुग्णसेवेत रुजू होणार आहे, असे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी लातूर शहरातील गाव भागातील पटेल चौक परिसरात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र विभाग व बालरोगशास्त्र विभागासाठी १८९ खाटांचे स्वतंत्र नवीन रुग्णालय इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, माजी महापौर दीपक सूळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, उपविभागीय अभियंता राजेंद्र बिराजदार, शाखा अभियंता प्रसाद स्वामी, चंद्रकांत धायगुडे, गोरोबा लोखंडे, दगडूआप्पा मिटकरी, गिरीश ब्याळे, सचिन बंडापल्ले, इमरान सय्यद, विष्णुदास धायगुडे, युनूस मोमीन, संजय म्हेत्रे, गोपाळ बुरबुरे, रमाकांत गडदे, प्रा. प्रवीण कांबळे, अभिषेक पतंगे, तबरेज तांबोळी, आयुब मणियार, व्यंकटेश पुरी, अॅड. फारुक शेख, पवन सोलंकर, निजाम शेख, अभिषेक पतंगे, सत्तार शेख, इसरार पठाण, रमाकांत गडदे, रामलिंग ठसे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते सर्व बूथप्रमुख प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होतील, असे सांगुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, सध्या महाराष्ट्रात भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे. राज्यातील महायुती सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार येईल. या रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण दिले जाईल, प्रभाग क्रमांक १, २, ६, ७, ८, ९, १० यामधील नागरिकांची या रुग्णालयात सोय होणार आहे. या भागात सामान्य कुटुंबातील रहिवासी आहेत. आपण कुठलेही काम अगोदर केले व त्यानंतर सांगितले. या रुग्णालयाच्या इमारत बांधकामाची कामे लातूरच्या स्थानिक लोकांना मिळाली पाहिजेत. या रुग्णालयात ३०० लोकांना काम मिळेल.
या रुग्णालयात फिजिओथेरपी अॅक्युपेशनल थेरेपी करण्यात येईल. आपण गाव भागातील अनेक कामे केली आहेत. काही कामे करायची आहेत. गावभागाचा नव्याने विकास आराखडा तयार करावा, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सर्वांनी महाराष्ट्र धर्म पाळण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राची सत्ता महाराष्ट्राच्या हाती असावी ती गुजरातच्या हाती नसावी. सर्व धर्मीय एकत्र मिळून आपण काम करुया. सध्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लातूरमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. कालच मध्यवर्ती बसस्थानकाजवळ खून झाला, त्याचा तपास करण्याच्या आम्ही पोलिसांना सूचना दिल्या आहेत. प्रत्येकाने सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. लातूरला आपण नेहमी सुरक्षित ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकठ यांनी आपले मनोगत व्यक्त्त केले तर दगडूआप्पा मिटकरी यांनी आभार मानले.