पंतप्रधान मोदी, १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन
नाशिक : प्रतिनिधी
सामाजिक स्वास्थ्य व आरोग्य शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये गरजेचे असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुरस्थ पध्दतीने उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, राज्याचे अन्न, नागरी, पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, आमदार अॅड. राहुल ढिकले, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, मा. आयुक्त डॉ. अशोक करंजकर, विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ आदी उपस्थित होते, तर ऑनलाईन पद्धतीने राज्यपाल
सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
समाजातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्यात एका दिवशी दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षणात नऊशेपेक्षा अधिक प्रवेश क्षमता वाढल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले.
आज पंतप्रधानांच्या हस्ते १० वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानुसार मुंबई, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलडाणा, वाशिम, भंडारा, हिंगोली आणि अंबरनाथ (ठाणे) येथे आता १० विद्यकीय महाविद्यालये सुरू झाली.