धाराशिव : प्रतिनिधी
शारदीय नवरात्र महोत्सवात गुरुवारी (दि. १०) रोजी आठव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली.
तुळजाभवानी देवीच्या नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिल्याची आख्यायिका आहे. म्हणून या दिवशी देवीला महाअलंकार घालण्यात येऊन भवानी तलवार अवतार पूजा मांडण्यात येते.
दरम्यान, बुधवारी (दि. ९) रोजी रात्री तुळजाभवानी देवीची छबिना मिरवणूक गरुड वाहनावरून काढण्यात आली. तर शुक्रवारी (दि. ११) रोजी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. सकाळी ७ वाजता होम व हवनास प्रारंभ होणार आहे. दुपारी १२.१५ वाजता पूर्णाहुती देण्यात येणार आहे.