पुणे : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील शाहूनगरच्या डी. वाय. पाटील स्कूलमध्ये ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना चक्कर येऊ लागली. त्यानंतर ते खाली पडले.
विद्यार्थ्यांची ही अवस्था पाहून पालकवर्गही हादरला. विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांना निष्कृष्ट अन्न खाऊ घालणा-या शाळेच्या प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील शाहूनगरच्या डी. वाय. पाटील स्कूलमध्ये गुरुवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सँडविच खाण्यासाठी देण्यात आले.
निकृष्ट दर्जाचे सँडविच दिल्यामुळे त्यातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. स्कूल प्रशासन आणि पालकांनी काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, या घटनेबाबत डी. वाय. पाटील स्कूलच्या प्रशासनाची भूमिकाही समोर आली आहे. सकाळी विद्यार्थ्यांना ब्रेड आणि चटणी खायला देण्यात आली होती. त्याच ब्रेड आणि चटणीतून ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.