संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी
इलेक्ट्रीक कार आणि कमर्शियल व्हेईकल उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी कंपनी छत्रपती संभाजीनगर ऑरिक सिटीच्या बिडकीन डिएमआयसी मध्ये ६३६ एकर जमिनीवर प्रकल्प उभारणार आहे. कंपनीच्या मागणीनुसार गुरूवारी ऑरिक प्रशासनाने कंपनीला जमीन देय पत्र दिले. ही कंपनी येथे तब्बल २७ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या कंपनीमुळे प्रत्यक्ष ५ हजार २०० आणि अप्रत्यक्ष १५ हजार असे एकूण २० हजार २०० रोजगार उपलब्ध होणार आहे.
ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणूकींचा ओघ वाढला आहे. राज्यसरकार सोबत सामंजस्य करार करण्यात आलेल्या टोयोटा-किर्लोस्कर, एथर एनर्जी, लुब्रिझोल या कंपन्यांनी एकापाठोपाठ गुंतवणूक करीत जमिन घेतली. या कंपन्यासोबतच जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी कंपनीने ऑरिक सिटीमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला होता. या करारानंतर कंपनीचे अधिकारी आणि राज्यसरकार यांच्यात चर्चेच्या यशस्वी फे-या झाल्या. उद्योग उभारण्यासाठी सर्वाधिक चांगले वातावरण छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याचे लक्षात येताच कंपनीने ऑरिक सिटीकडे अर्ज करून ६३६ एकर जमिनीची मागणी केली होती.
‘जेएसडब्ल्यू’ कंपनीने एकूण जमिनीच्या किंमतीच्या ५ टक्के रक्कम ऑरिक प्रशासनाकडे अदा केली होती. कंपनीच्या मागणीनुसार बिडकीन ‘डिएमआयसी’मध्ये ५४६ एकर आणि ९० एकर असे एकूण दोन भूखंडाचे देयकार पत्र गुरूवारी प्रदान करण्यात आल्याची माहिती ऑरिकचे व्यवस्थापक महेश पाटील यांनी दिली.