बीड : ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात बीड जिल्हा कारागृहात असलेल्या सुरेश कुटे यांनी ठेवीदारांचे पैसे हाँगकाँगला नेल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले होते. यानंतर आता ईडीने मोठी कारवाई केली आहे. ज्ञानराधा मल्टिस्टेट कंपनीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत १ हजार ९७ कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील विविध गावातील व्यापा-यांनी व सर्वसामान्य खातेदारांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या पैठण शाखेत ज्यादा व्याज देण्याच्या आमिषाला बळी पडून पाच कोटीहून अधिक रक्कम ठेवली होती. मुदत संपून देखील खातेदारांची ठेवलेली ठेव परत मिळत नसल्याने तसेच ही शाखा पैठण मधून बंद केल्याने खातेदारांनी ज्ञानराधा बँकेविरुद्ध संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे व प्रमुख संचालक पत्नी अर्चना सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळाविरुद्ध रोजी तक्रार दाखल केली होती.
बीडसह छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना, आदी जिल्ह्यांत ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या ५२ शाखा आहेत. यामध्ये सहा लाखांपेक्षा अधिक ग्राहक असून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये कुटे ग्रुपच्या तिरूमला ग्रुपची आयकर विभागाकडून तपासणी झाली. त्यानंतर ठेवीदारांनी घाबरून ज्ञानराधामधील ठेवी काढून घेतल्या. परंतु मल्टिस्टेटमधील पैसे संपल्याने या ठेवी परत देण्यात कुटे असमर्थ ठरले होते. पैसे परत देण्यासह सुरेश कुटे यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठेवीदारांनी आंदोलने केली. ठेवीदारांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतरही कुटे यांच्याकडून सोशल मीडियावर व्हीडीओ टाकून परदेशातून पैसे येत असल्याचे आश्वासन दिले जात होते. परंतु ठेवीदारांचा वाढता रोष पाहून पोलिसांनी सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर यांना पुण्यातून ताब्यात घेतले होते.
मालमत्तेवर जप्तीची कारवाई
यानंतर बीडच्या जिल्हा कारागृहात असलेल्या सुरेश कुटे यांची ईडीच्या अधिका-यांनी न्यायालयाच्या परवानगीने तीन दिवस चौकशी केली होती. ईडीने याआधी ज्ञानराधाच्या विविध शाखांवर छापे टाकले होते. सुरेश कुटे यांनी ठेवीदारांचे पैसे हाँगकाँगला नेल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले होते. आता ईडीकडून ज्ञानराधा मल्टिस्टेट कंपनीची तब्बल १ हजार कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सुरेश कुटे यांच्याशी संबंधित मुंबई, संभाजीनगर, बीड, जालना येथील मालमत्तेवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत १ हजार ९७ कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई झाली आहे.
४२ हून अधिक गुन्ह्यांची नोंद
सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पथसंस्था नोव्हेंबर २०२३ मध्ये अडचणीत आली. या पतसंस्थेवर प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर तीन लाख ७० हजार ठेवीदार, खातेदारांचे ३७०० कोटी रुपये या पतसंस्थेत अडकले आहेत. या प्रकरणात या पतसंस्थेवर ४२ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ५० शाखांचे मागच्या वर्षीचा ऑक्टोबर महिन्यापासून आर्थिक व्यवहार ठप्प असल्याचे सांगितले जात आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील इंदोर आणि अन्य ठिकाणी ५० शाखा असून साडेसहा लाख खातेदार आहेत.