जामनगर : भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अजय जडेजा आज मालामाल झाला आहे. गुजरातमधील जामनगर राजघराण्याचा पुढील उत्तराधिकारी म्हणून शत्रुशल्यसिंहजी जडेजा यांनी अजय जडेजा यांची निवड केली आहे. शत्रुशल्यसिंहजी जडेजा यांनी विजयादशमीचा शुभ मुहूर्त साधत ही घोषणा केली आहे. शत्रुशल्यसिंहजी यांनी एक पत्र जाहीर केले आहे. त्यानुसार आज दस-याच्या दिवशी पांडव हे वनवास संपवून विजयासह परतले होते. या शुभ मुहूर्तावर मी कोंडीतून सुटलो आहे. मी माझा उत्तराधिकारी नेमला आहे. मला विश्वास आहे की जामनगरच्या जनतेचा आशीर्वाद त्यांना मिळेल आणि ते पूर्ण निष्ठेने त्यांची सेवा करतील. मी सर्वांचा आभारी आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
माजी क्रिकेटपटू अजय जडेजा जामनगरचा आहे. त्याचे नवानगर संस्थानशी संबंध आहेत. ते रणजितसिंहजी जडेजा आणि दलीपसिंहजी जडेजा यांच्या कुटुंबातील आहेत. त्यांच्या नावावरूनच भारतात रणजी ट्रॉफी आणि दुलीप ट्रॉफी खेळण्यात येते. रणजितसिंहजी जडेजा आणि दलीपसिंहजी क्रिकेटपटू असतानाच नवानगर संस्थानचे राजे होते. याशिवाय शत्रुशल्यसिंहजी यांचे वडील दिग्विजयसिंहजी हे पण त्याच घरातील आहेत. ८५ वर्षांचे शत्रुशल्यसिंहजी यांना अपत्य नाही. यामुळे त्यांनी पुढील वारस म्हणून अजय जडेजा यांची निवड केली आहे.
शत्रुशल्यसिंहजी जडेजांची अष्टपैलू कामगिरी
शत्रुशल्यसिंहजी जडेजा चांगले क्रिकेटपटू होते. त्यांनी १९५८-५९ मध्ये सौराष्ट्र संघासाठी तत्कालीन बॉम्बे संघाविरोधात फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी १९५९-६० मध्ये तीन सामने खेळले होते. तर १९६१-६३ मध्ये त्यांनी आठ सामने खेळले होते. त्यांनी इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट क्लबमध्ये पण जोरदार फलंदाजी केली आहे. पण त्यांना कधीही भारतीय संघाकडून खेळता आले नाही. शत्रुशल्यसिंहजी यांनी फर्स्ट क्लास करिअरमध्ये २९ सामने खेळले असून, त्यामधील २२ सामन्यांमध्ये सरासरी १०६१ धावा केल्या आणि ३६ बळी घेतले.