28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रशेतक-यांनी खरेदी केले ४ हजार ट्रॅक्टर्स

शेतक-यांनी खरेदी केले ४ हजार ट्रॅक्टर्स

कांदाने दिला हात द्राक्ष बागायतदार शेतक-यांना फायदा

नाशिक : यावर्षी कांद्यासह अन्य नगदी पिकांनी साथ दिल्याने जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात चार हजार दोनशेवर ट्रॅक्टरची विक्री झाली. एक ट्रॅक्टर सहा लाखांचा गृहित धरल्यास सुमारे २४० कोटी रुपये या खरेदीवर खर्च झाला आहे. वरचेवर रडवणा-या कांद्याला मिळालेल्या चांगल्या भावाने शेतक-यांच्या चेह-यावर हसू आहे. दिवसेंदिवस बैलजोडी सांभाळणे खर्चिक होत असल्याने यांत्रिकीकरणाकडे वाढणारा शेतक-यांचा कल यातून स्पष्ट होतो.

ट्रॅक्टर खरेदीसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतक-यांसाठी राबविल्या जाणा-या यांत्रिकीकरण योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतक-यांनी पुरेपूर घेतल्याचे यातून दिसते. यंदा शेवटच्या टप्प्यात उन्हाळ कांद्याला समाधानकारक भाव मिळाल्यामुळे शेतक-यांना लाखोंचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे शेतक-यांनी यंदा ट्रॅक्टर खरेदीला पसंती दिली. नवरात्र काळात सुमारे दोनशेहून अधिक ट्रॅक्टरची विक्री झाली. ‘कांद्याला भाव मिळाला, अन ट्रॅक्टर दाराशी उभा राहिला, अशा प्रतिक्रिया बागलाण तालुक्यातील शेतक-यांकडून ऐकायला मिळत आहे.

पारंपरिकऐवजी शेतकरी आधुनिक शेतीची कास धरत आहे. शेतक-यांच्या अंगणातल्या खिल्लारी बैलजोडीची जागा ट्रॅक्टर घेत आहे. साधा नांगर, पलटी नांगर, पळी नांगर अशी यंत्रे जोडून शेतक-यांना हव्या त्या प्रकारात नांगरणी त्यामुळे करता येते. रोटर, फण, फळी, पेरणी ही यंत्रेही ट्रॅक्टरला जोडता येतात. नांगरणी, वखरणी, पेरणी तसेच द्राक्ष व फळबागांमधील फवारणी इत्यादी कामे पारंपरिक पद्धतीने करण्यात खर्ची पडणारा वेळ ट्रॅक्टरमुळे वाचत आहे. एकूण मागणीपैकी सुमारे ३५ टक्के ट्रॅक्टर आता बिगरकृषी कारणांसाठी वापरले जातात. यातून तरुणांना रोजगारही मिळत आहे.

बिनव्याजी कर्जयोजनेचा लाभ
राज्य शासनाच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये व्यावसायिक तथा युवा उद्योजक तयार होण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते. लाभार्थी शेतक-यांना सात वर्षांत परतफेड करता येत असल्याने या योजनेला प्रतिसाद वाढत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR