मेहसाणा : शनिवारी गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात भिंत कोसळल्याने अनेक लोक ढिगा-याखाली गाडले गेले. या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून मातीचा ढिगारा बाजूला काढण्याचे काम सुरु आहे.
मेहसाणा जिल्ह्यातील कडी तालुक्यातील जसलपूर गावाजवळील एका खासगी कंपनीमध्ये बांधकामाच्या ठिकाणी सात जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही ४ ते ५ मजूर अडकल्याची शक्यता आहे. कारखान्यासाठी भूमिगत टाकी बसविण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक माती खचल्याने त्या जागेवर काम करणारे मजूर मातीच्या ढिगा-याखाली अडकले. टाकी खोदणा-या मजुरांवर मोठ्या प्रमाणात माती पडली आणि ते खाली अडकले गेले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. रुग्णवाहिका आणि पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आतापर्यंत मातीच्या ढिगा-याखालून सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
भूमिगत टाकी खोदताना माती खचली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसलपूर गावात अनेक कामगार एका कारखान्यासाठी भूमिगत टाकी खोदत असताना माती खचली. या ढिगा-याखालून सात मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही तीन ते चार मजूर मातीखाली गाडले असण्याची शक्यता आहे. स्टील आयनॉक्स स्टेनलेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत झालेल्या अपघातानंतर जेसीबीच्या सहाय्याने माती काढण्यात येत आहे. कंपनीत सध्या बांधकाम सुरू आहे. कामगार टाकी खोदत असताना अचानक माती खचली.
संपूर्ण परिसरात शोककळा
या घटनेची चौकशी सुरू असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना राबविण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, पीडितांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.