नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला असून भाजप हा दहशतवाद्यांचा पक्ष आहे, असे म्हणत खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्याचबरोबर मल्लिकार्जून खरगे यांनी हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही भाष्य केले.
मल्लिकार्जून खरगे म्हणाले, जे बुद्धीवादी आहेत, त्यांना अर्बन नक्षल म्हणत आहेत. काँग्रेसला म्हणत आहेत. ही त्यांची सवय आहे. त्यांचा स्वत:चा पक्ष दहशतवाद्यांचा पक्ष आहे. लिंचिंग करतात, मारतात. अनुसूचित जातीच्या लोकांच्या तोंडात लघवी करतात. आदिवासींना आणून त्यांच्यावर बलात्कार करतात. दहशतवादी पक्ष तर त्यांचा आहे असा पलटवार खरगेंनी मोदींच्या टीकेला उत्तर देताना केला.
पुढे खरगे म्हणाले, जे लोक हे सगळे(अत्याचार) करतात, त्यांना हे लोक (भाजप) पाठिंबा देतात. वरून दुस-यांना बोलतात. मोदींना तर अधिकारच नाही. त्यांची सरकारे जिथे-जिथे आहेत. तिथे मागास लोकांवर अत्याचार होतात. विशेषत: आदिवासींवर अत्याचार होतात. वरून ही गोष्टी तेच बोलतात की, बघा तुमच्यावर (आदिवासींवर) हल्ले होत आहेत. सरकार आमचं आहे का? तुमचं सरकार आहे, तुम्ही नियंत्रित करू शकता. पण, मोदींची सवय आहे, असेच बोलतात, अशा शब्दात खरगेंनी मोदींकडून केलेल्या जाणा-या अर्बन नक्षल टीकेला उत्तर दिले.
हरियाणातील अहवालानंतर चित्र स्पष्ट होणार
काँग्रेसला सलग तिस-यांदा हरयाणातील सत्तेपासून दूर राहावे लागले. सत्तेने हूलकावणी दिल्यानंतर या निकालाबद्दल बोलताना मल्लिकार्जून खरगे म्हणाले, हरयाणामध्ये जे काही झाले आहे, आम्ही त्यासंदर्भात बैठका घेत आहोत. अहवाल आल्यानंतर हे स्पष्ट होईल की, काय करण्याची गरज आहे आणि हे असे कसे घडले? पूर्ण देश आणि इतकेच नाही, तर भाजपाही म्हणत होती की, काँग्रेस जिंकणार; तरीही अशी कोणती कारणे आहेत, ज्यामुळे काँग्रेस पराभूत झाली? विजयानंतर अनेक लोक श्रेय घेतात, पराभवानंतर अनेक लोक टीका करतात, असे भाष्य खरगेंनी केले.