चेन्नई : दिवाळीचा सण सध्या अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीनिमीत्ताने मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचा-यांना अनेकदा छोटी-मोठी भेटवस्तू देत असतात. पण चेन्नई येथील एका कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचा-यांना दिलेले गिफ्ट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. या कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचा-यांना चक्क २८ कार आणि २९ बाईक गिफ्ट केल्या आहेत. या गाड्यांच्या मॉडेल्समध्ये हुंदाई, टाटा, मारुती सुझुकी आणि मर्सिडीज बेंझ अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
असे महागडे गिफ्ट देणा-या चेन्नईच्या या कंपनीचे नाव टीम डिटेलिंग सोल्युशन्स असे आहे. ही कंपनी स्ट्रक्चरल स्टील डिझाइन आणि डिटेलिंग सर्व्हिस संबंधित काम करते. एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, कर्मचा-यांची मेहनत आणि समर्पण पाहाता कंपनीने इतक्या महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत. या कंपनीत सुमारे १८० कर्मचारी आहेत.
तर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीधर कन्नन यांनी सांगितले की, आम्ही कमपनीच्या यशात त्यांचे अथक प्रयत्नांसाठी त्यांचे कौतुक करू इच्छीतो. आम्ही समजतो की आमचे कर्मचारी आमची सर्वांत मोठी संपत्ती आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, कंपनीने कर्मचा-यांच्या योगदानाचे त्यांची कामगिरी आणि ते किती वर्षांपासून काम करत आहेत याच्या आधारावर मुल्यमापन केले आहे. आमच्या कर्मचा-यांना अत्यंत समर्पण भावनेने काम केले आहे. आम्हाला त्यांच्या यशावर गर्व आहे.